लालपरीची हार की सरकारची जीत ?

एसटी कर्मचा-यांचा संपाचा आज अकरावा दिवस आहे. जसजसा संपाचा काळ लांबला आहे, तसे या एसटीच्या एक लाख कुटूंबाचा प्रश्न वाढत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीला झळ बसली. पण त्याआधी एसटी नफ्यात होती का हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. जरा कुठे गाडी रुळावर येते असा विचार मनात येत असताना एसटी कर्मचा-यांनी विलीनीकरणासाठी संप पुकारला. ऐन दिवाळीत सणाला एसटी रस्त्यावर नव्हती. त्यामुळे रस्त्यावरचा शुकशुकाट मागच्या वर्षीप्रमाणे पुन्हा जाणवला.
वास्तविक ही लालपरी किती महत्त्वाची आहे, हे सरकारला जाणवून देणं महत्त्वाचं आहे. २०- २५ वर्षांपूर्वी आमदार, खासदार एसटीतूनच प्रवास करत होते. शाळेतल्या मुलांच्या सुट्ट्यांसाठी त्यांना सफर घडवण्यासाठी एसटीचा महत्त्वाचा वाटा आहे. पण आता हे चित्र बदललं आहे. लोकप्रतिनिधी या एसटीतून नव्हे तर स्वत:च्या अलिशान वातानुकुलित गाड्यांमधून फिरतात. आता तर हे लोकप्रतिनिधी लालपरीतून जाणार, हीच एक मोठी बातमी असते.
मग या कर्मचा-यांनी पुकारलेले आंदोलन, संप महत्त्वाचा की उगाचच हा प्रश्न समोर येतो. वास्तविक एसटीचे विलिनकरण होईल का नाही? हे जरी माहित नसले, तरी हा मुद्दा नक्की योग्य आहे. सर्वसाधारणपणे एका चालकाला महिना १२ हजार रुपये पगार तर कंडक्टरला १० हजार पगार दिला जातो. पण ही रक्कम खरचं पुरेशी आहे का? संपूर्ण कुटूंब चालवण्यासाठी लागणारा पगार आणि त्याबदल्यात करुन घेण्यात आलेली सेवा याचे जर समीकरण मांडले तर ते नक्कीच काजवे चमकण्याइतकं विचलित आहे. पूर्वी विधीमंडळात एसटीच्या नफ्या-तोट्यावर चर्चा होत होती. आता तो मुद्दाच अस्तित्वात नाही. तुम्ही कामावर या आणि मग चर्चा करु असे जरी परिवहन मंत्री अनिल परब म्हणत असले, तरी त्यांच्या शब्दात तो जोर नाही. याला कारण एकच. जर एसटीचे विलिनीकरण केले तर सरकारच्या तिजोरीवर किती कोटीचा भार पडेल. तसेच अन्य साठ महामंडळांकडून विलिनिकरणाची मागणी येऊ शकते. असं असताना राज्य सरकार मात्र अजूनही कुठलीच पावले उचलत नाही. अनेक ठिकाणी एसटी कर्मचारी आपला जीव गहाण ठेवून काम करतात. तर आंदोलनात अनेकांनी आपले जीव गमावले. आत्महत्येचा प्रयत्न केला. पण अजूनही सरकार गप्प का… असा सवाल कर्मचारी करत आहे. जर लालपरीची खासगीकरणाकडे वाटचाल होणार असेल तर ही नक्कीच महाविकास आघाडीची हार असेल. सगळ्यांच्या किफायतशीर सेवेसाठी असलेली लालपरी आज बसस्थानकात रुसून बसली आहे. पण ही रुसलेली लालपरी कधी रस्त्यावर धावणार, याकंडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सरकारची हार की जीत यापेक्षा लालपरीची हार की जीत याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा