लालपरी’चा नव्या युगात प्रवेश – पार्सलसाठी व्यवसायिक मार्गाचा अवलंब!

पुणे १३ फेब्रुवारी २०२५ : एसटी महामंडळाने आपल्या पार्सल सेवा अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता पार्सल वाहतुकीसाठी खासगी कंपनीला अधिकृत टेंडर देण्यात आले असून, एसटीच्या चालक-वाहकांना अनधिकृतरित्या कोणतेही पार्सल वाहून नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गावखेड्यांतील नागरिकांची एसटी चालक-वाहकांशी असलेली पार्सलविषयक नाळ तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी प्रशासनाच्या नव्या धोरणानुसार, अधिकृत कंपनीमार्फतच सर्व पार्सल सेवा पुरविली जाणार आहे. यामुळे औषधे, महत्वाची कागदपत्रे किंवा इतर साहित्य एसटीच्या चालक-वाहकांना देण्याची प्रथा आता बंद होणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने पैसे घेऊन पार्सल वाहतूक केल्यास, त्यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा महामंडळाने दिला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या दप्तरांसाठी हा नियम लागू नसल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

व्यवसायिक टेंडरचा नवा प्रयोग

एसटी महामंडळाने २०२१० पर्यंत एका खासगी कंपनीला पार्सल वाहतुकीचे टेंडर दिले आहे. प्रत्येक बसस्थानकावर या कंपनीचे कार्यालय असेल, जिथे नागरिक आपली पार्सल पाठवू शकतात. चालक-वाहकांनी फक्त अधिकृत कुरिअरच वाहून न्यावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच, प्रवासादरम्यान या वस्तू गहाळ झाल्यास जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असेल.

याआधी एसटी बसमधून औषधे, लहानशा वस्तू, एखाद्या प्रवाशाचे सामान अशा गोष्टी नेण्याची परंपरा होती. मात्र, त्याचा गैरफायदा घेत काही ठिकाणी अनधिकृत मालवाहतूक सुरू होती. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

चालक-वाहकांसाठी कठोर नियमावली

महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार, चालक आणि वाहकांनी प्रवाशांच्या फक्त वैध साहित्याचीच वाहतूक करावी. कोणत्याही परिस्थितीत पैसे घेऊन मालाची ने-आण केल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल.

या निर्णयामुळे गावखेड्यांतील नागरिकांना थोडा मनस्ताप होण्याची शक्यता आहे, कारण एसटी चालक-वाहकांशी असलेला त्यांचा विश्वास आता एका खासगी कंपनीकडे वळणार आहे. मात्र, सुरक्षित आणि शिस्तबद्ध सेवेसाठी हा बदल आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे