अंबरनाथ, ३ सप्टेंबर २०२०: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान नविन रेल्वे स्थानकाला रेल्वे प्रशासनाकडून २०१७ मध्ये परवानगी मिळाली होती. चिखलोली रेल्वे स्थानक असे या स्थानकाचे नाव आहे . खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चिखलोली रेल्वे स्थानक सुरू करण्याकरिता रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे अंबरनाथ व बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान चिखलोली रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळाली होती. मात्र आता या रेल्वे स्थानकाकरिता जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला ग्रीन सिग्नल मिळाल्याने या जमीन संपादनाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
या रेल्वे स्थानकामुळे अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे हे रेल्वे स्थानक लवकरात लवकर बांधून तयार व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान चिखलोली स्थानकाची उभारणी करावी, अशी मागणी गेल्या २०-२५ वर्षांपासून केली जात होती. आज बुधवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर रेल्वेचे उप मुख्य अभियंता श्री.एम.जी. कटके, भूमिअभिलेख उपअधीक्षक मीना पांढरे, विकास अडांगले, शाखाप्रमुख रामदास मोहपे, युवासेना तालुका अधिकारी शैलेश भोईर, अंबरनाथ तहसीलदार जयराज देशमुख व रेल्वे प्रशासनाचे अभियंता यांच्यासह नियोजित रेल्वे स्थानकाच्या जागेची पाहणी केली.
हे प्रस्तावित रेल्वे स्थानक लवकरच अस्तित्वात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. शासनाने सातत्याने केलेल्या मदतीमुळे आणि त्याच्या सहकार्यामुळे हे रेल्वे स्थानक उभारलं जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जमीन संपादनाचे काम पुर्ण होताच पुढील प्रकियेला सूरूवात केली जाईल असे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे