उत्तर प्रदेश, १६ मे २०२३ : नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी आज केंद्रीय अन्वेषण विभागाने पाटणा, दिल्ली आणि गुरुग्रामसह ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये बिहारचे माजी मंत्री प्रेमचंद गुप्ता यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय जनता दलाच्या आमदार किरण देवी यांच्या पटना आणि आरा येथील निवासस्थानी सीबीआयने कारवाई केली आहे. किरण देवी या माजी आमदार अरुण यादव यांच्या पत्नी असून, अरुण यादव हे आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात.
नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा हे २००४ ते २००९ या काळातील आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना कथितपणे भेटवस्तू किंवा विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी दिल्या, असा आरोप आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआय करत आहे. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
ईडीने मार्च महिन्यात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावरही छापे टाकले होते. ही कारवाई राजकीय आकसातून करण्यात आल्याचा आरोप आरजेडीच्या वतीने करण्यात आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर