खालापूर, २० जुलै २०२३ : रायगड जिल्ह्यातील खालापूरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावावर ही दरड कोसळली आहे. इर्शाळ गडाच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे. रात्री संपूर्ण गाव झोपलेले असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात २००-२५० लोकसंख्या असलेले गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तर ५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.१०० ते १२५ लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळते.
घटनास्थळी सध्या अतिशय शोकाकूल वातावरण आहे. हे गाव दरडीखाली दबले गेल्याने शेजारच्या गावातील लोक आपल्या नातेवाईकांच्या काळजीपोटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.या ठिकाणी लोकांचा आक्रोश दिसून येत आहे.या घटनेची माहिती मिळताच बदलापूरहून एक व्यक्ती इर्शाळवाडीत दाखल झाली आहे. त्यांची मुलगी या गावात राहाते. तिच्या काळजी पोटी ते इर्शाळवाडीत पोहोचलेत.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. मात्र इर्शाळगड हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. या गावात जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी यंत्रणा पोहोचण्यास अडचणी येत आहेत. जेसीबी. पोकलेन यासारखी वाहणे पोहचू शकत नाहीयेत. त्यामुळे कुदळ, फावड्याच्या सहाय्याने एनडीआरएफ कडून बचावकार्य केले जात आहे. स्थानिकही या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.
दरम्यान रायगडचे पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन,दादा भुसे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. ते या सगळ्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडी गावात दाखल झाले आहेत. तिथल्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत ते धीर देत आहेत. आमच्या नातेवाईकांना वाचवा, अशी विनंती स्थानिक मुख्यमंत्र्यांकडे करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर