क्वालालंपूर, १६ डिसेंबर २०२२ :मलेशियातील एका कॅम्पिंग साईटवर शुक्रवारी पहाटे भूस्खलन झाल्याचे वृत्त आहे. भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मलेशियाच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या बाहेरील भागात सेलंगोर राज्यात भूस्खलन झाले. शुक्रवारी पहाटे तीन वाजता फार्महाऊसजवळ रस्त्याच्या कडेला दरड कोसळल्याने हा अपघात झाला.
- ५० हून अधिक लोक बेपत्ता
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ५० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अग्निशमन आणि बचाव विभागाने सांगितले की, तीन जण जखमी झाले असून ५१ अद्याप बेपत्ता आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. लोकांना बाहेर काढण्याचे कामही वेगाने सुरू आहे. बाहेर काढलेल्या लोकांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाचे संचालक नोराझम खामीस यांनी सांगितले की, आत्तापर्यंत छावणीच्या ठिकाणाहून ३१ जणांची सुटका करण्यात आली आहे. शिबिराच्या ठिकाणापासून सुमारे ३० मीटर उंचीवरून भूस्खलन झाले. सुमारे एक एकर क्षेत्र यामुळे बाधित झाले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू असून, मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.