आशिया क्रिकेटवर ‘लंकाराज’ श्रीलंकेनं पाकिस्तानचा २३ धावांनी उडवला धुव्वा

दुबई, १२ सप्टेंबर २०२२ : आशिया चषक २०२२ चा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत २३ धावांनी विजय मिळवत आशिया चषक आपल्या नावे केला. याचबरोबर श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषक जिंकण्याची कामगिरी केली. भानुका राजपक्षे व वनिंदू हसरंगा हे श्रीलंकेच्या विजयाचे नायक ठरले.

श्रीलंकेने तब्बल आठ वर्षांनी आशिया चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली. यापूर्वी त्यांनी २०१४ साली आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर आठ वर्षांनी त्यांनी हे जेतेपद पटकावले आहे.

पाकिस्तानने महत्वाची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आलं. श्रीलंकेच्या संघानं पॉवर प्लेच्या आत तीन विकेट्स गमावले. श्रीलंकेचा निम्मा संघ १० षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. कुसल मेंडिस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. निसांका आणि सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी २१ धावांची भागीदारी केली. पण निसांका ११ चेंडूत ८ धावा करून माघारी परतला.दानुष्का गुणथिलकलाही ४ चेंडू १ धाव या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. यानंतर धनंजय डी सिल्वाही २१ चेंडू २८ धावा स्वस्तात माघारी परतला. कर्णधार दासुन शनाकाही अवघ्या दोन धावांवर असताना बाद झाला. 

हसरंगा आणि राजपक्षे यांनी पाचव्या विकेटसाठी ५८धावांची भागीदारी केली. हसरंगा ३६धावा करून बाद झाला. पण भानुका राजपक्षेनं संघाची एक बाजू संभाळून ठेवली. त्यानं चमिका करुणारत्नेसह ३१ चेंडूत ५४ धावांची भागीदारी करत श्रीलंकेची धावसंख्या १७० धावांपर्यंत पोहचवली.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या १७१ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आल्यानंतर पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानी संघाचा पहिला गडी बाबर आझमच्या रुपात बाद झाला. त्याने अवघ्या पाच धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेल्या फखर जमान याने निराशा केली. तो खातेदेखील खोलू शकला नाही. तो त्रिफळाचित झाला. तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या इफ्तिखार अहमद आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांनी मैदानात चांगले पाय रोवले होते. दोघांनी ७१ धावांची भागिदारी केली. मात्र १४ व्या षटकात इफ्तिखार अहमद ३२ झेलबाद झाला. हसरंगाने रिझवान, आसिफ अली व खुशदील शाह यांना एकाच षटकात बाद करत सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकवला. नसीम शहाने काही षटकार मारत थोडीफार झुंज दिली. मात्र, अखेरच्या चेंडूवर त्याला बाद करत करुणारत्नेने पाकिस्तानचा डाव १४७ धावांवर संपवला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा