पक्षिविश्व- टिटवी(Lapwing)

भारतात प्रामुख्याने लाल तोंडाची टिटवी आणि पिवळ्या तोंडाची टिटवी असे दोन प्रकार आहेत. लाल तोंडाची टिटवी सर्वत्र तर पिवळ्या तोंडाची टिटवी आसाम वगळता भारतात सर्वत्र आढळते. पिवळ्या तोंडाची टिटवी ही लाल तोंडाच्या टिटवीपेक्षा किंचित लहान असते. टिटवी हा पक्षी इराक, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशांत आढळतो. जगभरात टिटवीच्या दोन प्रजाती आणि २५ जाती आहेत. बहुधा पाणवठ्याच्या जागी हा पक्षी जोडीने दिसतो. प्रजननाच्या हंगामाखेरीज ते मोठ्या कळपाने आढळतात. टिटवीचे शास्त्रीय नाव व्हॅनेलस इंडिकस आहे.

टिटवी हा पक्षी कोंबडीच्या उंची एवढा आहे. पाठ आणि पंख फिकट तपकिरी असतात. पोटाकडची बाजू पांढरी असते. डोके, मान व गळा काळा असून छातीचा वरचा भाग काळा असतो. डोळ्यांच्या मागून एक पांढरा पट्टा निघून मानेच्या बाजूवरून खाली जातो. पंखांची आणि शेपटीची टोके काळी असतात. लाल तोंडाची टिटवीच्या दोन्ही डोळ्यांसमोर तांबड्या रंगाची पीसविरहित मांसल त्वचा असते. तशीच रचना पिवळ्या तोंडाच्या टिटवीची आहे. पाय लांबट पिवळे असून त्यांवर तीनच बोटे आणि तीही पुढच्या बाजूला असतात. त्यामुळे टिटवीला बोटांनी पकड घेऊन झाडांच्या फांद्यांवर किंवा तारेवर बसता येत नाही. हा पक्षी जमिनीवरच राहतो.

टिटवी पक्षी जोड्यांनी किंवा ३ ते ४ च्या गटांनी चालत जमिनीवरील कीटक, अळ्या, सुरवंट, लहान गोगलगायी किंवा अन्य अपृष्ठवंशी प्राणी शोधून खाण्यात व्यस्त असतात. तृणधान्य, अन्य बीजे, कोवळी पाने आणि फुलांच्या पाकळ्या यांचाही अधूनमधून त्यांच्या आहारात समावेश असतो.

टिटवी नर आणि मादी यांच्या बाह्यरूपात विशेष फरक नसतो. मार्च ते ऑगस्ट हा त्यांच्या विणीचा हंगाम. उघडया जमिनीवरच दोन-चार दगडगोटे यांनी तयार केलेल्या जुजबी घरट्यात मादी चार अंडी घालते. फिकट तपकिरी रंगाच्या अंड्यांवर लहानमोठे काळे डाग आणि ठिपके असतात. आकाशात घिरट्या घालणारे नर-मादी आरडाओरड करून आणि प्रसंगी हल्ला करून शत्रूला घरट्यापासून दूर हुसकून देतात. त्यांच्या ओरडण्यातून संकेत मिळताच पाय दुमडून पिले जमिनीलगत बसून राहतात. जमिनीच्या,दगडांच्या रंगांशी एकरूप झाल्यामुळे ती शत्रूच्या लक्षात येत नाहीत. नंतर ओरडण्यातून वेगळे संकेत मिळताच पिले उठून चालू लागतात.

हिवाळ्यात आणि वसंत ऋतूत टिटवी हे पक्षी अधिक उंचीच्या भागात स्थलांतर करतात आणि पावसाळ्यात पुन्हा खाली सखल भागात येऊन पाणवठ्यानजिक राहतात. ‘टिट्-टिट्-ट्यू टिट्’ अशा त्यांच्या खास शैलीतील ओरडण्यामुळे त्यांची उपस्थिती जाणवते. रात्रीही ते जागरुक आणि क्रियाशील असतात. नेहमी सतर्क असणारे हे पक्षी माणसाच्या किंवा इतर शत्रूंच्या उपस्थितीची जाणीव इतरांना करून देण्यासाठी ओरडत असतात. त्यांच्या या कर्कश्श ओरडण्याला काही भागात अशुभ मानले जाते. पण ही त्यांची नैसर्गिक क्रिया आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा