पुरंदर, दि. १८ मे २०२०: कोरोना संकटाविरुद्ध संपूर्ण जग लढा देत असतानाच, मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊसाने व वादळी वाऱ्यामुळे वाल्हे, मांडकी या पुरंदरच्या दक्षिण भागात शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना, मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारे वाहू लागले, त्यानंतर काही वेळाने गारांचा पाऊस सुरू झाला.
वाल्हे परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांच्या शेतामधील काढलेले कांदे, भुईमूग, मका आदी पिके पावसामुळे भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच आडाचीवाडी, पिंगोरी येथील अंजीर, सिताफळ, चिक्कू, आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तसेच जनावरांचा ओला चारा मका, हात्ती घास, व्हंडी, मेथीघास आदीचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या शेतामधील उभा चारा वादळी- वाऱ्यामुळे शेतामध्ये पडल्याने शेतकरीवर्गासमोर हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहेत.
वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे अनेक विद्युत खांब पडल्याने वाल्हे परिसरामधील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. पाऊस सुरू होण्याच्या आधीच जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने विद्युतपुरवठा खंडीत झाला होता.
अवकाळी पाऊसामुळे अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अंजीराची अनेक झाडे मधूनच दुभंगली असून अनेक फांद्या तुटून, अंजीर, सिताफळ, चिक्कू, लिंबू अशा प्रकारच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र या परिसरामध्ये दिसत आहे.
यामध्ये शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब खाटपे व शेतकरी विलास पवार, कैलास पवार, ओम पवार, काशिनाथ पवार, अक्षय पवार, निलेश पवार, प्रकाश पवार आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे