वनडे वर्ल्डकप क्वालिफायर पात्रता फेरीत, आयर्लंड विरुद्ध स्कॉटलंडचा शेवटच्या चेंडूवर विजय

झिम्बाब्वे २३ जून २०२३: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळवली जाणार आहे. यामध्ये १० संघ सहभागी होणार असुन क्रमवारीच्या आधारे आठ संघ निश्चित करण्यात आले आहेत तर इतर दोन संघ क्वालिफायरद्वारे ठरवले जातील. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसह १० संघ पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत. झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्वालिफायर स्पर्धेतील टॉप-२ संघ विश्वचषकात सहभागी होतील.

सध्या सुरु असणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या ७ व्या तसेच एका रोमांचक सामन्यात, स्कॉटलंडने शेवटच्या चेंडूवर आयर्लंडचा एक गडी राखून पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात ओमानने यूएईचा ५ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने ५० षटकांत ८ गडी गमावून २८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंडने ९ गडी गमावून शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. स्कॉटलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ब्रॅडन मॅकमुलेनने कारकिर्दीतील सर्वोत्तम पाच बळी घेतले. आयर्लंडकडून कर्टिस कॅम्फरने १२० आणि डॉकरेलने ६९ धावा केल्या. या दोघांशिवाय अँडी मॅकब्राईनने ३२ धावांचे योगदान दिले.

२८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडची सुरुवात खराब झाली. स्कॉटलंडने १५२ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. आयर्लंडची पकड मजबूत दिसत होती, अशा स्थितीत मायकेल लेस्कच्या ६१ चेंडूत नाबाद ९१ धावांच्या जोरावर स्कॉटलंडने शेवटच्या चेंडूवर १ गडी राखून विजय मिळवला. आयर्लंडकडून मार्क एडेअरने ३ तर जोशुआ लिटल आणि जॉर्ज डॉकरेलने २-२ विकेट घेतल्या. दुसरीकडे झालेल्या सामन्यात ओमानने यूएईचा पराभव करत लीगमधील आपला दुसरा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना UAE संघाने ८ बाद २२७ धावा केल्या. हे लक्ष्य ओमान संघाने ४६ षटकात ५ गडी गमावून पूर्ण केले.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा