दिवंगत अभिनेते गुरुदत्त यांच्या बहिण ललिता लाजमी यांचे निधन

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२३ :दिवंगत अभिनेते गुरुदत्त यांच्या बहिण ललिता लाजमी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यांच्या पश्चात मुलगा देवदास आणि मुलगी कल्पना लामजी असा परिवार आहे.

ललिता लाजमी यांना कलेची आवड होती. त्यांचे आर्टवर्क प्रसिद्ध होते. ललिता लाजमी यांनी आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या सिनेमात छोटी भूमिका देखील साकारली होती. त्या शास्त्रीय नृत्यातही पारंगत होत्या.

जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ललिता यांचा फोटो शेअर केला असून, म्हटले आहे की, ‘कलाकार ललिता लाजमी यांचे निधन झाले आहे ही बातमी सांगताना आम्हाला दु:ख होत आहे. त्या शास्त्रीय नृत्यात स्वारस्य असलेल्या स्वयं-शिक्षित कलाकार होत्या’. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत दु:ख व्यक्त केले आहे.

ज्यांनी ललिता लाजमी यांचे काम जवळून पाहिले आहे त्यांच्या निधनाने अतिशय भावूक झाले आहेत. ‘मी त्यांच्या आर्ट प्रदर्शनाला ३ दिवसांपूर्वीच गेलो होतो. फार दु:ख होत आहे.’ अशी कमेंट एकाने केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा