गाव शिवारातली माती देशाच्या राजधानीपर्यंत पाठवणार लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे

लातूर, १० ऑगस्ट २०२३: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अमृत सप्ताह चे औचित्य साधत, लातूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रभात फेरी काढण्यात आली. लातूर शहराच्याजवळ शामनगर ह्या गावामधे मोठ्या उत्साहात प्रभात फेरी झाली. हातात तिरंगी झेंडे घेऊन शाळेचे विद्यार्थी, महिला, बी.एस.एफ चे जवान उत्साहात उभे होते.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते प्रभात फेरीला सुरूवात झाली, गावातल्या शेतातली माती कलशात घालण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी कलश आपल्या डोक्यावर घेतले. अमृत रोपाटिकेमध्ये मान्यवरांच्या हस्ते ७५ देशी वृक्षाच्या रोपट्याची लागवड करण्यात आली. ते अमृत वन म्हणून ओळखले जाणार आहे. अमृत वनाला लागून सेल्फी पॉईंट करण्यात आला होता. तिथे मान्यवरांसह सर्वांनी हातात माती घेऊन कलशात अर्पण करतानाच्या सेल्फीचा आनंद घेतला. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर राष्ट्र भक्तीच्या वातावरणाने चैतन्यदायी झाला होता.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता करताना आपल्या गाव शिवारातली माती देशाच्या राजधानीपर्यंत पाठवणार आहोत. तिथे या मातीतून अमृत वन, अमृत वाटिका निर्माण होईल. अशाच अमृत वाटिका, अमृत वने या जिल्ह्यातल्या अनेक गावात, तालुक्यात आणि जिल्हाच्या ठिकाणी होणार आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाले. त्याची ही चिरंतन आठवण पुढच्या पिढीला स्वातंत्र्याचं मोल सांगेल, अशा भावना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

१३, १४ आणि १५ ऑगस्ट या दिवशी तुमच्या घरावर तुमच्या घरच्या स्त्रीच्या हस्ते मग ती बायको, बहीण, आई, मुलगी कोणी आपला राष्ट्रध्वज लावा, असे आवाहन पुरुषांना उद्देशून जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, बी.एस.एफ.चे डिप्टी कमांडर सुधीर वाघचौरे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा