बारामती, ९ ऑक्टोबर २०२०: बारामती तालुक्यासाठी आपत्कालीन वेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे मोबाईलच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व नागरिकांना सुरक्षा कवच मिळणार आहे. बारामतीत पोलीस अधिकारी, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणा शुभारंभ आज पार पडला. यावेळी नाशिक जिल्ह्याचे ग्रामसुरक्षा यंत्रणाचे संचालक डी. के.गोर्डे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा विषयक मार्गदर्शन केले. या यंत्रणेमुळे अवघ्या एका फोनमुळे गावातील सर्व लोकांच्या मोबाईलवर एकाच वेळी फोन जाऊन लोकांना सावधान करून अनेक दुदैर्वी घटना आता रोखल्या जाणार आहेत.
ग्राम सुरक्षा यंत्र लवकरच बारामतीकरांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच आपत्कालीन घटनेशिवाय गाव पातळीवरील महत्वाचे संदेश देखील या माध्यमातून ग्रामपंचायतीला देता येणार आहेत. यंत्रणेसाठी २ विशेष पोलीस अधिकारी नेमले असून, मोबाईल मध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील प्रत्येक कुटुंबाचे फोन क्रमांक नोंदणी होणार आहे. यामुळे पोलीसांवरील ताण कमी होणार आहे. ही यंत्रणा जगातील उत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा म्हणून नावारूपास आली आहे. यंत्रणा सध्या नाशिक, पुणे, नगरमध्ये सक्रीय आहे. यंत्रणेत १ हजार ५०० गावे असून, ५ लाख ५० हजार पेक्षा जास्त नागरिक आहेत. तर १७५ सरकारी कार्यालये कार्यरत आहेत. एखाद्या घरावर रात्री, बेरात्री पडणारा दरोडा, चोरी, आग लागणे,महिलांसंदभार्तील छेडछाड, व इतर गुन्हे, वाहन चोरी, मुल पळवून नेणे, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, बिबट्या, तरस,लांडगा यांचा हल्ला आदी अशा महत्वपूर्ण घटनांमध्ये जवळच्या नागरिकांना मोबाईल फोनच्या मदतीने संकटकाळी लोकांशी संपर्क साधून दुदैर्वी घटना टळणार आहे.
या यंत्रणेवर ग्रामीण भागासाठी विशेष पोलीस अधिकारी म्हणून बारामती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते, तर शहरच्या अधिपत्याखाली येणाऱ्या गावासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांची निवड करण्यात आली आहे. तर ग्रामसुरक्षा यंत्रणासाठी प्रत्येक कुटुंबाला वषार्साठी ५० रुपये एवढा खर्च येणार असून, तो खर्च ग्रामपंचायत उचलणार आहे.
यावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते, पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, गणेश लोकरे, सर्व ग्रामसेवक,पोलीस पाटील उपस्थित होते. १८००२७०३६०० यावर संपर्क साधल्या नंतर गावातील हजारो लोकांना फोन जाणार आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव