लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे निधन

मुंबई, १० डिसेंबर २०२२ : ज्येष्ठ पार्श्‍वगायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक लावण्या त्यांनी ठसकेबाज केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

‘कृष्णसुदामा’ या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम मराठी गाणे गायले. या चित्रपटाच्या श्यामसुंदर पाठक व भट्टाचार्य या संगीत दिग्दर्शकांच्या जोडीने त्यांना प्रथम गायनाची संधी दिली. वयाच्या अकराव्या वर्षापासून सुलोचना चव्हाण यांनी पार्श्वगायनास सुरुवात केली. तर १९६२ मध्ये त्यांनी जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेली ‘रंगल्या रात्री’ या चित्रपटासाठी पहिली लावणी गायली. ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची’ या लावणीमुळे त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. सुलोचना चव्हाण यांनी मराठीबरोबर अनेक हिंदी, पंजाबी व गुजराती गाणीही म्हटली आहेत.

‘मल्हारी मार्तंड’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट लावणी गायिकेचा सन्मान, ‘पी. सावळाराम-गंगा जमना’ पुरस्कार आणि राज्यशासनामार्फत २०१० या वर्षासाठी संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार देऊन सुलोचना चव्हाण यांना गौरविण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा