पुणे, 25 ऑक्टोंबर 2021: विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळ प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही कायम राहिला. विभागाच्या विविध रिक्त पदांसाठी रविवारी होत असलेल्या भरती परीक्षेत पुणे आणि नाशिक केंद्रांवर गोंधळ उडाला. या केंद्रांवर प्रश्नपत्रिका कमी आल्या, तर काही ठिकाणी उशिरा मिळाल्या अशी उमेदवारांची तक्रार होती. ‘क’ गटातील पदांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका मिळण्यात विलंब, चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका, असा ढिसाळ नियोजनाचा अनुभव विद्यार्थ्यांना आला.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. या उमेदवारांना पेपर लिहिण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जाईल असे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागांतर्गत वर्ग ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिल्लीतील न्यासा कम्युनिकेशन्स कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. ही कंपनी निविदा प्रक्रियेतून निवडण्यात आली असून, गेल्या महिन्यात या परीक्षा होणार होत्या. मात्र, गेल्या महिन्यात न्यासाने पुरेशी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून न दिल्यामुळे ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
पुणे आणि नाशिकमध्ये गोंधळ
पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं होतं. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले होते.
नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळाला. पेपर प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. विद्यार्थी संख्ंयेच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे