इंदापूर, दि. २ ऑगस्ट २०२०: मित्र – मैत्रिणींशिवाय आयुष्याला अर्थ नाही. आनंद, राग व्यक्त करण्यासाठी हक्काची माणसे म्हणजे आपले मित्र. तुम्ही यंदा फ्रेंडशिप डे कशा पद्धतीनं साजरा करणार आहात?
आयुष्यातील महत्त्वाच्या आणि जवळच्या नात्यांपैकी एक खास नातं म्हणजे ‘मैत्री’. माया, प्रेम, जिव्हाळा असलेल्या या नात्याची आपण स्वतःहून निवड करतो. या नात्याला कोणतीही बंधन नसतात. अटी – शर्तीपलिकडील हे नातं निराळंच असतं. मित्र-मैत्रिणी कायम सोबत नसले तरीही या नात्यात दुरावा येत नाही. मैत्री या दोन अक्षरी शब्दामध्ये भरपूर ताकद आहे.
मित्र-मैत्रिणींवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास दिवसाची आवश्यकता नसते. पण प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘मैत्री दिवस’ म्हणजे ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं हा दिवस साजरा करतात. ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी आता नवनवीन प्लान आखले जातात. काही जण पिकनिक, ट्रेक किंवा एकमेकांच्या घरी जाऊन मैत्री दिवस साजरा करतात. शाळेतील तसंच कॉलेजमधील विद्यार्थी आजही एकमेकांना चॉकलेट, ग्रीटिंग कार्ड, फ्रेंडशिप बँड देऊन हा दिवस साजरा करतात.
आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे
जगभरातील देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. २७ एप्रिल २०११ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ३० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, भारतासह कित्येक देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो.
न्यूज अनकट प्रतिनिधी