सोलापूर, १९ ऑक्टोबर २०२०: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याबाबत टीप्पणी केली होती. याला आज उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. सध्या उद्धव ठाकरे सोलापूरच्या दौऱ्यावर आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्रीही सध्या राज्यात ठिकठिकाणी दौरा करत आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याबाबत टीप्पणी केली होती. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं. असंही ते बिहारला जातच आहेत, दिल्लीतही जावं”, असं खोचक उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं.
“शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदतीची सुरुवात केलेली आहे. पण, केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही. केंद्र सरकार हे पक्षाचं सरकार आहे. कदाचित ते पक्षाच्या दृष्टीने विचार करत असतील. पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
यंदाही पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी हताश आणि हतबल झाला आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. हे आपण सर्व पाहतच आहात पण, नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी काहीतरी बोलायलाच हवं किंवा मागायलाच हवं असं नाही. आम्ही हे ओळखून आहोत आणि शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही स्वतःहून प्रयत्न करत आहोत आणि हे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे