महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी विधानपरिषदेची निवडणूक – प्रवीण दरेकर

इंदापूर दि.२० नोव्हेंबर २०२० : राज्यामध्ये स्थापन झालेले महाआघाडीचे सरकार हे अनैसर्गिकरित्या स्थापन झालेले सरकार आहे. एवढे बेफिकीर,संवेदनाहीन आणि निष्क्रिय सरकार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ही विधानपरिषदेची निवडणूक आहे,असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 20) इंदापूर येथे केले.

इंदापूर येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार व पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात प्रवीण दरेकर बोलत होते.यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

दरेकर पुढे म्हणाले,’ संग्रामसिंह देशमुख आणि जितेंद्र पवार जिंकून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल अटळ आहे. तो पायगुण या दोन्ही उमेदवरांच्यात आहे.केवळ जितेंद्र पवार किंवा संग्राम देशमुख आमदार बनणार एवढ्यापुरती हि निवडणूक सीमित नसून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दिशेने आणि भविष्याच्या दृष्टीने दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. आज राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न,शेतकरी आत्महत्या,एसटी कर्मचाऱ्यांचा पगार,अतिवृष्टीची नुकसान भरपाई व वीज बिलासारखा ज्वलंत प्रश्न असताना सरकारकडे मात्र हे विषय समजून घ्यायला वेळ नाही.पाच वर्षात देवेंद्र फडणीस यांनी या राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला.फडणवीस सरकारच्या काळामध्ये विनाअनुदानित शाळांना मदत करण्याचा निर्णय घेतला गेला. चंद्रकांत पाटील यांनी देखील या मतदारसंघात नेतृत्व करत असताना शिक्षकांच्या व पदवीधरांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र आजच्या सरकारचा संपूर्ण वेळ केवळ आणि केवळ बदल्या करण्यामध्ये चालला आहे. उद्याच्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करायची झाली तर केवळ आणि केवळ बदल्या करण्यामध्येच महा विकास आघाडी सरकारची नोंद होईल.

ते पुढे म्हणाले, बिहारचे नियोजन करायला प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारचा थेट लाभ मिळत होता. शिवाय शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसा जात होता. केवळ बिहारच नाही तर इतर राज्यांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी मोठा जनाधार दिला आहे. महाराष्ट्रातील सरकार अपयशी ठरल्यानंतर या निवडणूका होत आहेत आणि म्हणून या निवडणूकांना अनन्य साधारण महत्व आहे.ग्राहकांना वाढीव बिले कमी करून देण्यापेक्षा ग्राहकांच्या जखमांवर मीठ चोळून ही वाढीव आलेली बिले बरोबरच आहेत आणि ते समजण्यासाठी आम्ही मेळावे घेऊ समजावून सांगू असे बेताल वक्तव्य केले जात आहे.राज्याचे ऊर्जामंत्री हे काँग्रेसचे आहेत आणि ते तुमच्या सरकारचा भाग आहेत. त्यांनी दिलेला प्रस्ताव तुम्ही का मान्य करत नाही किंवा त्यांना पैसा का उपलब्ध करून देत नाहीत असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. यांना ग्राहकांचा प्रश्न सोडवायचा नाही. आज महाराष्ट्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अशा वेळी मतदानाच्या माध्यमातून तो असंतोष व्यक्त केला जात असतो. म्हणून पदवीधरांनी आणि शिक्षक मतदारांनी हे दाखवून द्यायचे आहे. समोरच्याचे डिपॉझिट जप्त करून दोन्ही उमेदवार निवडून द्यावे.’

हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, इंदापूर तालुक्यामध्ये १०८६१ पदवीधर मतदार आहेत तर १२०८ शिक्षक मतदार आहेत. सरकारच्या एक वर्षाच्या निष्क्रिय कारभारानंतर आलेली ही पहिली निवडणूक असून इंदापूर तालुक्याने या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून संग्रामसिंह देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना विजयी करून महाराष्ट्राला या निवडणुकीच्या माध्यमातून संदेश देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे इंदापूर तालुक्याने मतदार नोंदणी संख्येमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नोंदणीची योग्य जबाबदारी पार पाडली त्याप्रमाणे आपल्या या दोन्ही मतदारांना मतदानामध्ये सर्वाधिक मताधिक्य इंदापूर तालुका देईल.

जितेंद्र पवार म्हणाले,’ शिक्षकांना शाळाबाह्य कामातून मुक्तता करणे, भ्रष्टाचारमुक्त कारभार, जुनी पेन्शन योजना लागू करणे, एक तारखेलाच वेळेवर पगार, शिक्षकांच्या प्रश्नासाठी ऑनलाइन सुविधा प्रणाली, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न तसेच संस्थाचालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करणारआहे.

यावेळी आ.राहुल कुल, तानाजी थोरात, सुभाष माने, अविनाश मोटे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी व आभार भाजपाचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.

प्रतिनिधी – निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा