पुणे, १७ जानेवारी २०२३ : पळसे गायखे मळा, नाशिक रोड या परिसरात चार ते पाच दिवसांपासून तीन बिबट्यांचे सतत दर्शन नागरिकांना होत असल्यामुळें शेतकरी आणि ग्रामस्थ भीतीच्या दहशतीखाली वावरत होते. अशातच सोमवारी (ता. १६) पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाने संबंधित बिबट्याला गंगापूर येथील नर्सरीत ठेवले आहे.
पळसे येथील बंगाली बाबा, गायखे मळा परिसरात रोज सकाळी आणि सायंकाळी तीन बिबटे नागरिकांना मुक्तसंचार करताना दिसून येत होते. त्यामुळे पळसे येथील मळे, गाववस्ती परिसरातील नागरिक, शेतकरी भयभीत होते. गुरुवारी (ता. १२ जानेवारी) बिबट्याच्या हल्ल्यात शिवाजी गायखे यांचे वासरू गंभीर जखमी झाले होते. नागरिकांच्या प्रसंगावधानाने वासराचे प्राण वाचले; परंतु नागरिक भयभीत होते. मळे परिसरातील नागरिकांनी ही घटना वनविभागाच्या नजरेस आणून देत पोलिसपाटील सुनील गायधनी यांनी विनंती केल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. दरम्यान, सोमवारी (ता. १६) पहाटे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाने संबंधित बिबट्याला गंगापूर येथील नर्सरीत ठेवले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील