श्रीरामपूरात बिबट्याचा मुक्तसंचार;वन कर्मचारी, अधिकारी गायब

श्रीरामपुर, दि.२९ एप्रिल २०२० : श्रीरामपुर तालुक्यातील प्रवरा पट्टासह ऐनतपुर, उक्कल गांव, चांडेवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. अनेक शेतकरी यांना बिबट्याच दर्शन झाले आहे. परंतु या भागातील शेतकऱ्यांची वनखात्याने दखल घ्यावी व या भागातील बिबटे जेरबंद करावे अशी वाट शेतकरी बघत आहेत.
सध्या कोरोनोचे कारण पुढे करत वन अधिकारी व कर्मचारी गायब झाले आहेत की काय? असा प्रश्न पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांनी फोनद्वारे त्यांच्या भागात बिबट्या आढळला असे सांगितले तर कोपरगांवचे वनअधिकारी संतोष जाधव चिडतात. सध्या कोरोनो मुळे शक्य नाही, तुम्ही घरा बाहेर पडु नका, मला संपर्क करू नका अशी उडवा उडवीची उत्तरे देतात.
ऐनतपुर येथील शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली. परंतु शेतकऱ्यांना तो पिंजरा, लोक वर्गणी करुन आणावा लागला. पिंजरा आणला पण आता भक्ष कोण टाकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत वनअधिकारी जाधव सांगतात की, पिंजरा आणलात तसेच भक्षही तुम्हीच टाका. मग वन खाते करतेय काय? असा संतप्त सवाल उपसभापती तोरणे यांनी केला आहे. या वनखात्याच्या हलगर्जीपणामुळे श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील ३ वर्ष वयाच्या रूपाली मारकड यांच्या मुलीवर बिबट्याने, हल्ला करुन जीव घेतला. त्यानंतर गंगापुर येथील श्रेया जाधव या मुलीचा चावा घेतला होता, अशा अनेक घटना ताज्या असताना हे वनअधिकारी कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत.

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनोचे थैमान सुरु आहे. त्यामध्ये शेतकरी अगोदरच मोठ्या संकटात सापडलेला आहे. महावितरणकडुन दिवसा विद्युत पुरवठा होत नाही, म्हणून शेतकरी आपली पिके उन्हाळ्यात वाचवण्यासाठी रात्री पाणी भरत असतात. त्यात बिबट्याची दहशत असल्याने येथील शेतकरी बांधव अतिशय संतापलेले आहेत. त्यामुळे या भागात तात्काळ पिंजरे लावण्यात यावे तसेच जे पिंजरे लावलेले आहेत त्यामध्ये वनखात्याने भक्ष आणुन टाकावे अशी मागणी सभापती बाळासाहेब तोरणे यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: दत्तात्रय खमेनर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा