दौंड शहरात बिबट्याची दहशत

5

दौंड, २ सप्टेंबर २०२०: दौंड शहराजवळ मेंढपाळच्या एका कुत्र्याचा फडशा पाडल्यानंतर राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वन विभागाकडून शोध सुरू आहे.

दौंड-लिंगाळी रस्त्यावरील मंगेश मेमोरियल शाळेसमोर एसआरपीएफच्या पडीक जागेत मेंढपाळाचे पाळ ठोकण्यात आले आहेत. १ सप्टेंबर रोजी बिबट्याने या पाळा जवळ एका कुत्र्याचा फडशा पाडून एका शेळीला जखमी केले. त्यावेळी मेंढपाळाने बिबट्यास हुसकावून लावले. मात्र, बिबट्या तेथून दौंड- कुरकुंभ रस्त्यावरील एसआरपीएफ गट क्रमांक सातच्या पोलीस वसाहतीमध्ये शिरल्याचे पोलिसांनी पाहिले. त्यामुळे एसआरपीएफकडून तातडीने वन विभागाला याची कल्पना देण्यात आली.

त्यानंतर बिबट्याला मानवी वसाहतीमधून हुसकावून लावण्यासाठी आधी ढोल बडविण्यात आले. त्यानंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले. ध्वनीवर्धकाद्वारे वसाहतीमधील नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली. दरम्यान, २ सप्टेंबर रोजी राज्य राखीव गट क्रमांक परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले आहे. बिबट्या एसआरपीएफच्या परिसरात आहे का अन्यत्र गेला, याबाबत वन विभागाकडून सर्व शक्यता पडताळून शोध घेतला जात आहे. बिबट्याचा दौंड शहरात प्रवेश झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

बिबट्याची माहिती मिळताच एसआरपीएफच्या सहकार्याने त्यास पळवून लावण्याचा प्रयत्न केला. दिवसभरात हालचालींवर लक्ष ठेवून पिंजरा लावण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल. बिबट्याचा वावर पुन्हा आढळल्यास करावयाच्या उपाययोजनांसंबंधी एसआरपीएफच्या पोलिसांना माहिती देण्यात आली असल्याची माहिती वनपाल चैतन्य कांबळे यांनी दिली आहे.

न्युज अन्कट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा