बारामती २६ जून २०२३: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वसमावेशक प्रशासक होत्या. त्यांनी महिलांसाठी सतीची चाल ही प्रथा बंद केली आणि महिलांच्या व सर्वसामान्यांच्या अन्यायविरुद्ध लढा दिला. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे, त्यांचा आदर्श घ्यावा. आम्ही त्यांचाच आदर्श घेऊन, काही दिवसातच राज्यातील महिलांना आमचे कर्नाटकातील सरकार प्रत्येक खात्यामध्ये दोन हजार रुपये देणार असून, महाराष्ट्रातील जनतेनेही राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार निवडून द्या, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
बारामती येथे शारदा प्रांगण मध्ये आयोजित करण्यात आलेल्या, अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठान बारामतीच्या अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कर्नाटकचे मंत्री आर बी देशपांडे, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, माजी आमदार आर जे रुपनवर, रमेश थोरात यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य तमाम भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे त्या काळातील होळकर घराण्यातील एक आदर्श महिला म्हणून त्या पुढे आल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात होळकर घराणे शूर आहेत आणि अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य तितकेच मोठे असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
राज्यसत्ता ही सामान्य माणसासाठी वापरायचे असते आणि राज्याच्या जनतेला सन्माननीय वागणूक द्यायची असते, त्याच आदर्श उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर होय. त्यांचा आदर्श पुढे घेऊन जाणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या कार्याची नोंद घेत, कर्नाटकच्या जनतेने त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. हा कर्नाटक साठी बहुमान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले.
आजचा हा जयंती महोत्सव कार्यक्रम, आदर्शवादी असून या सोहळ्यामध्ये स्पर्धा परीक्षा व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे. सोबतच एमपीएससी यूपीएससी मधील अधिकारी वर्गाचाही सत्कार झाल्याने हा सत्कार सर्वांना प्रेरणादायी व समाजातील मुलांसाठी भविष्याचा वेध घेणारा ठरेल असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरवर्षी प्रमाणे आज बारामती मध्ये साजरा होणारा अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव सर्वांसाठी आदर्शवत असा जयंती उत्सव आहे. बारामतीतील विश्वास नाना देवकाते व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केल्याने हा महाराष्ट्रातला एक उत्तम व आदर्शवादी जयंती महोत्सव असल्याचे मत विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे प्रमुख पाहुण्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, सुप्रियाताई सुळे व विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास नाना देवकाते यांनी केले, तर सनी देवकाते यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- आनंद पवार