नवी दिल्ली, ७ ऑक्टोंबर २०२०: मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ बोगद्याचं लोकार्पण केलं. वाहतुकीच्या दृष्टीनं हा बोगदा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मात्र, या लोकार्पण दरम्यान नरेंद्र मोदी यांनी मोकळ्या बोगद्यात हात दाखवला होता आणि याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोशल मीडिया वापरकर्त्यां बरोबरच राजकीय नेत्यांनीदेखील नरेंद्र मोदी यांच्या या कृत्यावर टिप्पणी करण्यास सुरुवात केली होती. केंद्र सरकारवर सातत्यानं टीकेचा मारा करत असणारे राहुल गांधी तरी यामध्ये कसे मागे राहतील. आता त्यांनीदेखील नरेंद्र मोदी यांच्या या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिलीय.
या फोटो वरून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिला की, “पंतप्रधानजी एकट्यानं बोगद्यात हात हलवणं सोडा, आपलं मौन तोडा. प्रश्नांना सामोरं जा, देश तुम्हाला खूप काही विचारत आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वार म्हटलं आहे. याबरोबरच त्यांनी इतर मुद्द्यांवर देखील भाष्य केलं. मात्र याबाबत त्यांनी काहीही न लिहिता आपल्याच भाषणातील एक व्हिडिओ शेअर केला. या भाषणात ते नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर वेगवेगळ्या विषयांवर टीका करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी कोरोना बाबतच्या स्थितीबद्दल, देशाची अर्थव्यवस्था, उद्योगांच्या वाढत्या समस्या, हाथरस बलात्कार प्रकरण आणि शेती विषयक पारित केलेले तीन कायदे याबाबत प्रश्न विचारले आहेत. दरम्यान या अगोदर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनीही ट्विटरवरुन मोदींवर रिकाम्या बोगद्यामध्ये केलेल्या या अभिवादनाबद्दल निशाणा साधला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे