कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द

6
कोल्हापूर, २५ डिसेंबर २०२०: रिझर्व बँकेकडून आता आणखीन एका बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. आरबीआय ने असे म्हटले आहे की, बँकेचे व्यवस्थापन ठेवीदारांच्या आणि खातेदारांच्या वर्तमान आणि भविष्यातील हीता विरोधात काम करत आहे. सध्या बँकेकडे मुबलक पैसे उपलब्ध आहेत, त्यामुळे बँक आपल्या खातेदारांचे व ठेवीदारांचे पैसे परत करू शकतात असे देखील आरबीआयने म्हटले आहे.
आरबीआयने या बँकेचा परवाना काल रद्द केला. खातेदार व ठेवीदार यांच्या हीता संबंधित असलेल्या नियमांचे बँकेकडून पालन केले जात नव्हते. सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या शाखा सातारा, सांगली, बेळगाव आणि पुण्यातही आहेत. सुभद्रा बँकेच्या कोल्हापुरात सुरुवातीला तीन शाखा कार्यरत होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून एक शाखाच कार्यरत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मागील दोन वर्षापासून या बँकेचे कामकाज ठीक रित्या चालू नव्हते. त्यामुळे अनेक ठेवीदारांनी आणि खातेदारांनी आपले पैसे काढून घेण्यास देखील सुरुवात केली होती.
मात्र, अजूनही या बँकेच्या ठेवीदारांचे व खातेदारांचे पैसे या बँकेमध्ये अडकून आहेत. नुकतेच रिझर्व बँकेने यासंदर्भात एक पत्रक देखील काढले होते. ज्यामध्ये रिझर्व बँकेने असे सांगितले होते की, बँकेची एकूण मालमत्ता व संपत्ती विकून ठेवीदारांचे व खातेदारांचे उर्वरित पैसे दिले जाऊ शकतात. गेल्या दोन वर्षांमध्ये या बँकांमधील ठेवी दोन कोटींपर्यंत पोहोचल्या होत्या. बर्‍यापैकी ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढल्या असल्या तरी उर्वरित खातेदारांचे पैसे व ठेवीदारांचे पैसे कसे मिळतील हा प्रश्न आता लोकांसमोर उभा राहिला आहे.
बँकेला देवाण-घेवाण करता येणार नाही
सुभद्रा लोकल एरिया बँकेचं कामकाज २४ डिसेंबर रोजी संपल्यानंतर त्या क्षणापासून बँकेचा परवाना रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे बँकेला कोणतीही देवाण-घेवाण करता येणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटलं आहे.
उच्च न्यायालयात माहिती देणार
दरम्यान, रिझर्व्ह बँक सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या एकूण कामकाजाचा लेखाजोखा उच्च न्यायालयात सादर करणार आहे. त्यामुळे बँकेची सध्याची पत आणि आर्थिक डबघाई अधिक स्पष्ट होणार आहे.
या नियमांतर्गत कारवाई
रिझर्व्ह बँकेने सुभद्रा एरिया लोकल बँकेवर बँक रेग्युलेटिंग अॅक्ट १९४९च्या सेक्शन २२ (४) अंतर्गत ही कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे बँक नियमन कायदा ५ (ब) नुसार बँकेला यापुढे कसलाही व्यवहार करता येणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा