दोहा, १९ डिसेंबर २०२२ : जगभरातील लाखो फुटबॉल चाहत्यांना दिलासा मिळू शकतो, अर्जेंटिनाचा ताईत लिओनेल मेस्सीने २०२२ फिफा विश्वविजेतेपद मिळविल्यानंतर अर्जेंटिनासाठी फुटबॉल खेळणे सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. लिओनेल मेस्सीने त्याच्या राष्ट्रीय संघासह, फ्रान्सचा पराभव केला. ”मी अर्जेंटिना राष्ट्रीय संघातून निवृत्त होणार नाही,” असे त्याने TyC sport ला सांगितले. “मला विश्वविजेता म्हणून खेळणे सुरू ठेवायचे आहे.”
रविवारी, अर्जेंटिनाचा ताईत लिओनेल मेस्सीचा शेवटचा विश्वकरंडक असलेल्या तीव्र संघर्षाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विजयी झाला. अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात सर्व गोल बरोबरीत सोडविल्यानंतर अर्जेंटिनाने पेनल्टीवर ४-२ असा अंतिम सामना जिंकला. लिओनेल मेस्सीला गोल्डन बॉल, फिफा विश्वकरंडकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान देण्यात आला. लुसेल येथे झालेल्या रोमहर्षक फायनलनंतर पेनल्टीमध्ये फ्रान्सवर ४-२ असा विजय मिळविल्यानंतर दिग्गज स्ट्रायकरची विश्वकरंडकाची स्वप्ने सत्यात उतरली. यंदाचा फिफा विश्वकरंडक खेळणारा मेस्सी संपूर्ण स्पर्धेत अव्वल फॉर्ममध्ये होता. महत्त्वपूर्ण गोल करणे, पेनल्टीचे रूपांतर करणे आणि गोल करण्यात त्याच्या सहकाऱ्यांना मदत करणे, ३५ वर्षीय दिग्गजाने हे सर्व केले. फ्रान्सच्या कायलियन एम्बाप्पेनंतर मेस्सी स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा दुसरा खेळाडू ठरला.
अर्जेंटिनाच्या दूतावासाने नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा आनंद साजरा केला. हा एक भावनिक क्षण आहे. मला आशा आहे, की हा मेस्सीचा शेवटचा विश्वकरंडक नाही, मला आणखी एक पाहायचा आहे,” असे अर्जेंटिनाचे राजदूत एचजे गोबी म्हणाले. अर्जेंटिनाच्या ऐतिहासिक विजयानंतर कोलकात्याच्या रस्त्यांवर शेकडो चाहत्यांनी जल्लोष केला.
बिधाननगर येथील श्री भूमी स्पोर्टिंग क्लबमध्ये अर्जेंटिना आणि मेस्सीचे चाहते विश्वकरंडक फायनल पाहण्यासाठी जमले होते. अर्जेंटिनाने तिसरा विश्वकरंडक जिंकला आणि १९८६ नंतर तब्बल ३६ वर्षांनी विश्वकरंडक जिंकला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड.