मनमाड, २२ जुलै २०२२: नुकतेच शिंदे गटात गेलेले सुहास कांदे यांनी आज आदित्य ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यात त्यांनी आदित्य ठाकरेंना अनेक सवालही विचारले. अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण देताना सुहास कांदे यांनी सांगितलं, की पहिली गोष्ट म्हणजे आम्ही बंड केलं नाही, उठाव केला आहे. त्यामुळे आम्ही बंडखोर नाहीत. आदित्य ठाकरेंना सवाल विचारताना सांगितलं की, जेव्हा एकनाथ शिंदेना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, तेव्हा त्यांना गृहखात्याने झेड प्लस सुरक्षा देण्याचे ठरले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी शुंभुराजे यांना सकाळी फोन करुन एकनाथ शिंदें यांना सुरक्षा पुरवू नका, असे सांगितले. जे हिंदुत्वाच्या विरोधात आहे, त्यांना झेड प्लस किंवा अशा पद्धतीची सुरक्षा का पुरवली जात आहेय़ असा सवाल कांदेनी आदित्य ठाकरेंना दिला. मग एकनाथ शिंदेंना का सुरक्षा दिली नाही, असा खरमरीत सवाल त्यांनी केला.
त्याचबरोबर याकुब मेमन त्याने चार-पाच हजार हिंदूना मारले, ज्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या याकुब मेमनची फाशी टळावी, यासाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, नवाब मलिक प्रयत्नशील होते. अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला बसावं लागत होतं. आम्ही निवडून आलो, त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होती. पण आता त्याऐवजी अशा लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागत आहे, ज्यांना हिंदुत्वाची कदर नाही. असे अनेक सवाल उठवत कांदेनी आदित्य ठाकरेंना निवेदन दिलं, की माझं म्हणणं ऐकून घ्या. आज अनेक दिवसानंतर कांदेची खदखद बाहेर आली. पण त्यामुळे शिवसेनेत किती गळचेपी होत होती, हे समोर आलं.
जर आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली, तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदार संघात आल्यावर मी त्यांना निवेदन देणाऱ आहे. जर माझ्या प्रश्नांची योग्य आणि समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली, तर मी आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.
यावर सतेज पाटील यांनी या आरोपांचे खंडण करत सांगितलं की, सुरक्षा देण्याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत. चीफ सेक्रेटरीच्या अंतर्गत ही प्रक्रिया होत असते. त्यामुळे या आरोपात मला काहीही तथ्य वाटत नाही, असं त्यांनी नमूद केलं.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना भेटण्याची परवानगी मान्य केली आहे. या भेटीत नाराज सुहास कांदेना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? पुन्हा एकदा सुहास कांदे शिवसेनेत येणार का? हे पहावं लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस