जम्मू-काश्मीरमध्ये सापडला लिथियमचा साठा

जम्मू, १० फेब्रुवारी २०२३ : जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लिथियमचा साठा सापडला आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने याला दुजोरा दिला आहे. केंद्र सरकारने सांगितले की, जम्मू काश्मीरमध्ये ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला असून, जो भारतातल्या वाहतूक व्यवसायला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. लिथियम हा एक नॉन-फेरस धातू आहे आणि EV बॅटरीमधील प्रमुख घटकांपैकी एक आहे.

गुरुवारी झालेल्या ६२ व्या सेंट्रल जिओलॉजिकल प्रोग्रामिंग बोर्डाच्या (CGPB) बैठकीत १५ इतर संसाधन भूवैज्ञानिक अहवाल आणि ३५ भूवैज्ञानिक ज्ञापनांसह हा अहवाल संबंधित राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आला आहे.

जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात याचे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे.

लिथियमचे अनेक फायदे आहेत. लिथियम, निकेल आणि कोबाल्ट यांसारखी खनिजे मोबाईल फोन, सोलार पॅनेलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जातात. याचा सर्वाधिक वापर रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो. ही खनिजे आपण ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनामधून आयात करतो. परंतू आता लिथियमचे साठे भारतात सापडल्याने भारत इलेक्ट्रॉनिक आणि ऑटो इंडस्ट्रीत आत्मनिर्भर होऊ शकतो.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा