टोल प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांचे आमरण उपोषण !

दौंड: दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथील तरुणाला टोल प्रशासनाच्या अधिकारी वर्गाकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त तसेच टोल प्रशासनाच्या मुजोर, मनमानी, दंडेलशाही कारभाराला कंटाळून स्थानिक ग्रामस्थ वसंत साळुंके, डॉ. मधुकर आव्हाड, विश्वास अवचट, दादासाहेब भंडलकर यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेत प्रजासत्ताक दिनाचे औचीत्य साधून टोल नाक्यावर आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलाची दखल प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी घेत दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्यासह आंदोलाकर्ते ग्रामस्थांना भेट दिली.

यावेळी ग्रामस्थांनी त्यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.पाटस टोल नाक्यावर बदली झालेल्या टोल प्रशासनाने वसुली करण्यासाठी स्थानिकांना त्रास देत अगदी मारहाणीचे प्रकार सुरु केले आहे.या विरोधात ग्रामस्थांनी एकजुटीने यावर निर्णय घेत उपोषण सुरु केले आहे.

पुणे सोलापूर महामार्गावारील नुतनीकरणात मुख्य रस्त्याचे काम पूर्ण होऊन जवळपास सात वर्ष होत आले आहे. मात्र या महामार्गावरील सुविधा आजही अर्धवट स्वरुपात असून यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गावातील परिसरात असणाऱ्या सेवा रस्त्याचे आहे. सेवा रस्त्या अभावी स्थानिकांना मुख्य रस्त्याचा वापर करावा लागल्याने शेकडो अपघात आजवर झाले आहेत.

कुरकुंभ, पाटस, हिंगणीगाडा, रोटी व अन्य गावांच्या सीमेवर हा टोल उभारण्यात आल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांना अगदी दोन ते पाच किलोमीटरच्या अंतरासाठी दोनशे रुपये टोल स्वरुपात द्यावे लागत आहेत. गेली अनेक वर्षापासून या टोल नाक्यावर स्थानीकांना टोल मधून सवलत देण्यात आली होती.मात्र या टोल वसुलीच्या प्रशासन बदलीचा फटका स्थानिकांना बसत आहे.

दरम्यान पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथील टोलनाक्यावरील प्रशासनाचा निषेध करीत परिसरातील सर्वच ग्रामंचायत, विविध संघटनांनी लेखी स्वरुपात पाठींबा देत उपोषण करण्याच्या ठिकाणी निषेध व्यक्त केला. स्थानिकांना टोल वसुलीतून वगळण्यात यावे, स्थानिक तरुणांना येथील रोजगारात समावेश करण्यासह अनेक मागण्या प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत तात्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक करून पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन प्रांताधिकारी यांनी दिले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा