इंदापूर, दि. ६ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा विकास योग्यरित्या झालेला नाही. नवीन उद्योग यायचे नाव घेत नसताना सध्याच्या उद्योगांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘एमआयडीसी मधील खुल्या जागांवर कचरा डेपो बनविला आहे, तर खुल्या जागेतील हजारो ब्रास मातीवर काहींनी डल्ला मारला आहे. त्यामुळे माती उचललेल्या बऱ्याचशा जागेत पावसाचे पाणी साठवून अक्षरशः डबकी बनली आहेत आणि हीच डबकी आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. त्यामुळे याकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील नवद्योजकांचे आणि कामगारांचे म्हणणे आहे.
इंदापूर तालुक्यात मोठे उद्योग उभारले जात नसल्याने बेरोजगारीची समस्या प्रचंड वाढली आहे. लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या छोटे-मोठे उद्योग सुरू आहेत. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी येथे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देणारे उद्योग आलेले नाहीत. सध्या असलेल्या उद्योगांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवीन ‘एमआयडीसी’ मध्ये रस्ता आहे. मात्र, या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. औद्योगिक वसाहतीमध्येही अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पथदिव्ये लावले असले तरी काही पथदिव्यांचे बल्ब खराब झालेले आहेत. एका ठिकाणी तर चक्क वेलींनी पथदिव्याचा खांब गुरफटून टाकला आहे.
या ‘एमआयडीसी’त अक्षरश: जागोजागी कचऱ्यांचे ढीग साठलेले पाहण्यास मिळत आहेत. एका मोकळ्या जागेत कचरा आणून टाकला जात असून, तेथेच तो पेटवून दिला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय, सार्वजनिक शौचालये नसल्याने रस्त्याच्याकडेलाही नागरिक घाण करताना दिसतात. कार्यालयाचे रुपडे पालटावे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय महामार्गगालगत असून त्याचा वापर होत नाही. कार्यालयाच्या समोरील जागेचेही सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. महामंडळाने सुधारणा करण्यास प्रारंभ केला, तर स्थानिक उद्योजकही त्यासाठी हातभार लावू शकतील. औद्योगिक वसाहतीमधील चौकांचे सुशोभीकरण, रस्त्यालगत झाडे लावणे, पथदिवे बसविणे आदी कामे उद्योजक करू शकतील.
पडीक जागा ताब्यात घ्या एमआयडीसी स्थापन झाल्यानंतर अनेकांनी उद्योग सुरू करण्यासाठी जागा घेतल्या आहेत. काही काळ तेथे उद्योग सुरू झाले. मात्र सध्या अनेक जागा पडून आहेत. त्यावर उद्योग सुरू नसल्याने महामंडळाचे नुकसान होत आहे. शिवाय, नवीन उद्योजकांना जागाही मिळत नाहीत. नवीन उद्योग सुरू करू इच्छित असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना या जागा देण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाने ज्या जागांवर आद्यप उद्योग सुरू झाले नाहीत परंतु वर्षानुवर्षे त्या जागा पडून आहे अशा जागा परत घेऊन त्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना
देण्यात यावे असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी न्युज अनकट शी बोलताना सांगितले.तसेच प्रशासनाने योग्य वेळी कार्यवाही न केल्यास.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे