लॉकडाऊनमुळे हवेली तालुक्यातील नर्सरी व्यावसायिक उध्वस्त

उरुळीकांचन, दि.२३ मे २०२० : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, नायगाव, पेठ, तरडे, कोरेगाव मूळ, उरूळी कांचन आदी गावांतील नर्सरी व्यवसाय उध्वस्त झाला आहे.

या व्यवसायाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. राज्य सरकारने हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लवकर पावले उचलावीत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आधार द्यावा, अशी मागणी नर्सरी व्यावसायिकांनी केली आहे.

कोरोनामुळे देशभर सगळे व्यवसाय थंडावले आहेत. नर्सरीचाही व्यवसाय पूर्ण बंद आहेत. विविध प्रकारची फुले, फळे शोभेची झाडे असलेल्या नर्सरी ग्राहकांअभावी ओस पडल्या आहेत. लॉकडाऊनमुळे रोपांची विक्री बंद झाली आहे. पूर्व हवेलीत कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे नर्सरीमालक आर्थिक संकटात सापडले आहेत. उलाढाल बंद असल्यामुळे व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीत. सरकारने याची गंभीर दखल घेऊन कोमेजलेल्या नर्सरी व्यावसायिकांच्या चेहऱ्यावरील कळी फुलेल, असा निर्णय घ्यावा, अशी मागणी नर्सरी व्यावसायिकांनी केली. कोरोनामुळे लग्नसराई व इतर कार्यक्रम बंद असून, लग्न समारंभासाठी फुलांची मोठी मागणी असते. मात्र, लग्नसमारंभ बंद असल्याने फूल विक्री बंद आहे. घरगुती सजावटीसाठी शोभिवंत झाडांच्या कुंड्यांची मोठी मागणी असते. यातून चांगले उत्पन्न मिळते; परंतु कोरोनाने यावरही पाणी फेरले आहे. नर्सरीतील झाडे जगविण्यासाठी नर्सरी मालकांची धडपड सुरू आहे. मालाला उठाव नाही. कामगार त्यांच्या राज्यात परत गेल्यामुळे अजून अडचण येत आहे. माल जागेवरच असल्यामुळे उत्पन्नाची दारे बंद झाली आहेत. त्यामुळे लॉकडाऊन केव्हा संपेल, याचीच आता नर्सरी मालक वाट बघत आहे.
दिल्ली,आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात यांसह आदी राज्यात रोपे जात असल्यामुळे आर्थिक बळ मिळत होते. परंतु कोरोनामुळे सर्व बाजार ठप्प झाल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक नाडी थंडावली आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी व्यावसायिकांडून होऊ लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा