राज्यात दोन-तीन दिवसांत लॉक डाऊन! मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत चर्चा

मुंबई, १२ एप्रिल २०२१: राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. राज्यात रविवारी (११ एप्रिल) दिवसभरात तब्बल ६३ हजारांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. हे लक्षात घेता काल मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत चर्चा केली. करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या लॉक डाऊन हा एकमेव पर्याय असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. याबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे.

‘टास्क फोर्समधील अनेक सदस्यांची लॉकडाऊन करण्याबाबतची भूमिका’

“या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाली. राज्यात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टास्कफोर्समधील अनेक सदस्यांची भूमिका आहे. जरुर काही सदस्यांचं मत वेगळं असू शकतं. पण बहुतांश टास्क फोर्सचं मत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं मत होतं. याबाबत आता मुख्यमंत्री बुधवारी (१४ एप्रिल) कॅबिनेट मिटिंग घेऊन चर्चा करुन योग्य निर्णय घेतील. त्यानंतर ते निर्णय घोषित करतील”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात लॉक डाऊन लागू करण्याचे संकेत शनिवारी देण्यात आले होते. परंतु, लगेचच सोमवारपासून लॉक डाऊन लागू केली जाणार नाही. सामान्य जनतेला दोन-तीन दिवसांचा अवधी द्यावा, अशी सूचना सर्वच राजकीय नेते व व्यापारी संघटनांनी के ली होती. त्यानुसार पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतरच लॉक डाऊनचा निर्णय घेतला जाईल. बहुधा १५ तारखेनंतर राज्यात लॉक डाऊन लागू केले जाऊ शकते. त्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला जाईल. सर्वांशी चर्चा करूनच दोन-तीन दिवसांत लॉक डाऊनचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे यांनी सांगितलेले आणखी काही महत्त्वपूर्ण मुद्दे :

मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत फक्त टास्क फोर्सचे सदस्य होते. या बैठकीत ऑक्सिजन कसं वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. या बैठकीत ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करु, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दुसरं म्हणजे लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टबाबत चर्चा झाली. हे प्लॅन्ट जिथे जिथे आहेत तिथे आपण सिलेंडर भरुन आणतो. त्या सिलेंडरला ट्यूबच्या माध्यमातून रुग्णांना देतो. मात्र, आता ज्या पद्धतीने या प्लॅन्टची संख्या आहे त्यानुसार ही पद्धत बंद करावी, हा मुद्दा चर्चेत मांडला. लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात टाकायचा, असा निर्णय घेण्यात आला. हा प्लॅन्ट टाकल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांसाठी ऑक्सिजन साठवता येऊ शकतं. त्यामुळे दररोजची पळापळ होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने बैठक घेणार आहेत. त्यावर तातडीने निर्णय होईल, असा विश्वास आहे.

आपण बघतोय, अंत्यसंस्कारच्या ठिकाणी गर्दी होतेय. ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. याबाबत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.

या बैठकीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन आणखी दहा-पंधरा दिवस काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. कारण त्यानंतर आपल्याला चांगला साठा मिळेल. इंजेक्शनचा अनावश्यक वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतही चर्चा झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा