लोकायुक्तांची BMC ला क्लीन चीट, सोमय्यांचे आरोप ठरले चुकीचे

5

मुंबई, २१ जानेवारी २०२३ : मुंबई महापालिकेतील कथित कोव्हिड घोटाळा प्रकरणी सध्या अंमलबजावणी संचलनालयाकडून इक्बाल सिंह चहल यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र लोकायुक्ताने मात्र रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीमध्ये मुंबई महापालिकेला क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे हा प्रकारे चहल यांच्यासह ठाकरे गटासाठी देखील मोठा दिलासा मानला जात आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबई महापालिका आणि ठाकरे गटावर जोरदार आरोप केले होते. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्नशच्या खरेदी अनियमितता आणि अपारदर्शकता झाल्याचा आरोप त्यांनी अनकेदा केला होता. घोटाळा झाल्याचे म्हणत सोमय्यांनी महापालिका प्रशासनाबाबतची तक्रार लोकायुक्तांकडे केली होती.

दरम्यान, या प्रकरणात पालिकेने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचा निर्वाळा देत लोकायुक्ताने मुंबई महापालिकेला क्लीन चीट दिली आहे.

किरीट सोमय्यांनी आरोप केलेले होते की, कोव्हिड काळात रेमडेसिवीरचा पुरवठा आणि खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला होता. महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीरची वाढती मागणी पाहता त्यावर काही निर्बंध आणले होते. हे इंजेक्शन कोणत्याही डिलर किंवा हॉस्पिटलला थेट न देता FDA च्या माध्यमातून याचा व्यवहार व्हावा किंवा पुरवठा केला जावा असे आदेश दिले होते.

दरम्यान, या प्रकरणी लोकायुक्तांसमोर सुनावणी देखील झाली. मुंबई महापालिकेने आपली बाजूही यावेळी मांडली. या सुनावणीनंतर लोकायुक्ताने आपला निर्णय मुंबई महापालिकेच्या बाजूने दिला आहे.

निर्णय देताना लोकायुक्ताने म्हटले आहे की, या संपूर्ण प्रकरणात आरोप सिद्ध होत नाहीत. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार हा रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीमध्ये झालेला नाही. जे पुरावे किरीट सोमय्या यांनी समोर आणले होते त्या पुराव्यांच्या आधारे कोणतेही आरोप सिद्ध होत नाही. म्हणून रेमडेसिवीर खरेदीमध्ये घोटाळा झाला नाही. असे स्पष्ट मत लोकायुक्ताने यावेळी व्यक्त केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा