पीएम मोदींना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर, पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, ११ जुलै २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदर्श नेतृत्व आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केल्याबद्दल, १ ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांच्या १०३ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी, टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट (हिंद स्वराज संघ) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणार आहे, असे आयोजक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी सांगितले.

त्यात म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदींनी नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली आणि भारताला जागतिक नकाशावर आणले. त्यांची चिकाटी आणि मेहनत लक्षात घेऊन आणि त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. इतर निमंत्रितांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा