नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, लोणावळा शहरात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. यावेळचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने समीकरणे बदलली असून, या गटातील इच्छुकांमध्ये मोठी चुरस वाढली आहे. आरक्षणामुळे राजकीय वातावरण तापले असून, प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका, अंतर्गत चर्चा आणि रणनीती ठरवण्याचे सत्र सुरू केले आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या गटातून दीपक मालपोटे यांच्या पत्नी ज्योती मालपोटे यांनी तयारी सुरू केली असून, अनेक इच्छुकांनी शेळके यांच्याकडे उमेदवारीसाठी संपर्क साधल्याची चर्चा आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तसेच, भाजपचे प्रफुल्ल मोहन काकडे आणि राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर हेदेखील इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी तब्बल १२, तर भाजपकडून सात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. आमदार सुनील शेळके स्वतः निवडणुकीवर लक्ष ठेवून असल्याने राष्ट्रवादीत उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. भाजपने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
भाजपमध्ये माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह राजेंद्र दिवेकर, सुरेश गायकवाड, गिरीश रमेश कांबळे, डॉ. सुनील जाधव, निरंजन कांबळे आणि अशोक मानकर हेही इच्छुक आहेत. दरम्यान, या निवडणुकीत माजी आमदार बाळा भेगडे आणि विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यातील अप्रत्यक्ष स्पर्धेमुळे ‘मामा विरुद्ध भाचा’ अशी राजकीय लढत पुन्हा रंगण्याची चर्चा असून, यामुळे लोणावळ्यातील ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. शहरातील नागरिकांचे लक्ष या राजकीय घडामोडींवर लागून राहिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
