पुणे २६ फेब्रुवारी २०२५: राज्यात जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नंबर प्लेट (HSRP) बंधनकारक करण्यात आली असली तरी याच्या किमतीवरून मोठा वाद पेटला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या प्लेट्ससाठी दुप्पट दर आकारले जात असल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकारने तीन कंपन्यांना वाढीव दराने टेंडर दिल्याने वाहनधारकांवर मोठा आर्थिक बोजा टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे.
३० एप्रिलपर्यंत अनिवार्य, पण दर अव्वाच्या सव्वा!
सन २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना ३० एप्रिलपूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु, यासाठी आकारण्यात येणारे दर महाराष्ट्रात प्रचंड जास्त असल्याने वाहनधारकांना आर्थिक फटका बसत आहे. अन्य राज्यांमध्ये या प्लेट्ससाठी कमी दर असूनही महाराष्ट्रात मात्र वाहतूक विभागाने वाढीव दर लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
इतर राज्यांत स्वस्त, महाराष्ट्रात महागडं का?
इतर राज्यांतील दर पाहता महाराष्ट्रातील दर दुप्पट आहेत. उदाहरणार्थ, गोव्यात ही प्लेट अवघ्या १५५ रुपये, गुजरातमध्ये १६० रुपये, तर झारखंडमध्ये ३०० रुपये मध्ये मिळते. मात्र, महाराष्ट्रात याच प्लेटसाठी तब्बल ५०० ते ७४५ रुपये आकारले जात आहेत. यामुळे सामान्य वाहनधारकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
वाहनधारकांचा संताप – सरकारने लुट थांबवावी!
महाराष्ट्रात ज्या तीन कंपन्यांना टेंडर देण्यात आले आहे, त्यांनी दर वाढवून घेतल्याचा आरोप होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे म्हणतात, “इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात HSRP साठी वाढीव दर लावण्यात आला आहे. हे दर कमी करावेत आणि वाहनधारकांना न्याय द्यावा.”
सरकारला जाब विचारण्याची वेळ
वाहनधारकांना सुरक्षा महत्त्वाची असली तरी त्यासाठी अवास्तव किंमत मोजावी लागणे अन्यायकारक आहे. नागरिकांचा संताप पाहता सरकारने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा, याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाहनधारक संघटनांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे