२०१४ ला डमी उमेदवाराने तटकरेंना पाडलं, यंदा अनंत गिते नावाचे ३ उमेदवार

रायगड, १९ एप्रिल २०२४ : नावात काय आहे असे म्हणतात पण निवडणुकीच्या राजकारणात मतपत्रिकेवरील नावेच महत्वपूर्ण ठरतात. कारण चर्चेतल्या नावांचे भांडवल करून निवडणुका लढवल्या जातात. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. रायगड जिल्ह्यात निवडणुकीत सारख्याच नावांचे उमेदवार उभे करून आव्हान उभे करण्याची पद्धत आहे. हीच पद्धत यावेळी देखील वापरण्यात आली आहे. आता २०२४ ला रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते नावाचे ३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्याच नावाचे तब्बल २ डमी उमेदवार उभे राहिल्याने मतविभाजनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे करायचे आणि विरोधकांच्या मतांचे विभाजन करून त्यांची कोंडी करायची, अशी खेळी विरोधकांकडून खेळण्यात आली आहे. विरोधकांनी अनंत पद्मा गिते, आणि अनंत बाळोजी गीते नामक २ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

जिल्ह्यात नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हा नामसाधर्म्याचा वापर करण्यात आला आहे. याची मोठी किंमत तटकरेंना चुकवावी लागली होती. २०१४ साली विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा पराभव डमी उमेदवारामुळेच झाला होता. सुनील तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला ९ हजार ८४९ मत पडल्याने तटकरे यांचा अवघ्या २ हजार मतांनी पराभव झाला होता. विरोधकांनी हीच बाब लक्षात घेऊन अनंत गितेंच्या विरोधात आता अशीच खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. अनंत गितेंचे यामुळे किती प्रमाणात नुकसान होईल ? तटकरेंना या गनिमी काव्याचा फायदा होईल का ? याबाबत आपले मत आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..

न्यूज अनकट प्रतिनिधी – धनंजय कवठेकर (अलिबाग)

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा