नवी दिल्ली, २९ सप्टेंबर २०२२ : लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची संरक्षण दल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान २०२१ साली लष्करातून निवृत्त झालेले आहेत. देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून संरक्षण दल प्रमुख हे पद रिक्त होते. दरम्यान केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जन्म १८ मे १९६१ रोजी झाला. १९८१ मध्ये त्यांनी भारतीय लष्कराच्या ११ गोरखा रायफल्सची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथून झालेले आहे.
मेजर जनरलच्या पदावर असताना त्यांनी उत्तर कमांडमधील महत्त्वाच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केलेले आहे. सप्टेंबर २०१९ पासून ते पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले आणि मे २०२१ मध्ये सैन्यातून निवृत्ती घेईपर्यंत हे पद सांभाळले होते.
लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांना लष्करातील परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अती विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. या आधी बिपिन रावत तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संरक्षण दल प्रमुखपदी जनरल बिपिन रावत यांची ३० डिसेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली होती. जनरल रावत हे ३१ डिसेंबर २०१९ रोजी लष्करप्रमुखपदावरून निवृत्त झाले होते. त्याच दिवशी त्यांनी संरक्षण दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. संरक्षण दल प्रमुखपदावरून सेवानिवृत्तीसाठी ६५ वर्ष ही वयोमार्याद आहे. आता भारताचे नवीन संरक्षण दल प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आहे.
अनिल चौहान यांनी ४० वर्षात लष्करी कारकिर्दीत कमांड, स्टाफ आणि इंस्ट्रूमेंटल पदांवर काम केलं होतं. शिवाय त्यांना जम्मू-काश्मीरमधील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे. त्यांचे कार्य हे संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातूनच समोर मांडण्यात आले आहे. ते एक निवृत्त अधिकारी असले तरी त्यांच्या अनुभवाचा भारतीय लष्करामध्ये मोठा फायदा होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड