तेलंगणा येथे झालेल्या ‘हिंद केसरी’ची गदा महाराष्ट्राकडे; अभिजित कटकेने सोमवीरला नमवीत पटकाविला किताब

पुणे, ९ जानेवारी २०२३ : तेलंगणा येथे रविवारी (ता. आठ) झालेल्या हिंद केसरी स्पर्धेतील अंतिम सामन्यात कुस्तीपटू अभिजित कटके याने हरियाणाचा पहिलवान सोमवीर याचा दणदणीत पराभव केला आहे. अभिजित कटकेच्या विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. अभिजितने सामन्यात सोमवीरला एकही संधी दिली नाही आणि सामना ४-० अशा फरकाने जिंकला.

भारतीय कुस्तीतील सर्वांत मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. या हिंद केसरी सामन्याचा अंतिम सामना रविवारी खेळला गेला. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजित कटके याने हरियाणाच्या सोमवीरला ४-० अशा फरकाने लोळवत किताबावर नाव कोरले. दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी, तर एकवेळा महाराष्ट्र केसरी राहिला आहे.

हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे जाते की हरियाणाकडे, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, अभिजितने धोबीपछाड देत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. २०१७ मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटके याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा