रणजी ट्रॉफी, 26 जून 2022: मध्य प्रदेशच्या संघाने चमकदार कामगिरी करत रणजी करंडक 2021-22 चे विजेतेपद पटकावलं आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात एमपीने मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला. मध्य प्रदेशने प्रथमच रणजी करंडक जिंकला आहे. याआधी त्यांनी 1999 मध्ये चंद्रकात पंडितच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरी गाठली होती, जिथं त्यांचा कर्नाटककडून 96 धावांनी पराभव झाला होता. तर चंद्रकात पंडित हे सध्या एमपीचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
मुंबईला दिलं होतं 108 धावांचं लक्ष्य
पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रातच मुंबईने आपल्या उर्वरित आठ विकेट गमावल्या, त्यामुळे मुंबईचा दुसरा डाव 269 धावांवर आटोपला. मुंबईसाठी दुसऱ्या डावात सुवेद पारकरने 51 धावांचं योगदान दिलं. त्याचवेळी संघाकडून सरफराजने 45 आणि कर्णधार पृथ्वी शॉने 44 धावा केल्या. एमपीकडून कुमार कार्तिकेयने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
एमपीने 108 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. एमपीसाठी दुसऱ्या डावात हिमांशू मंत्रीने सर्वाधिक 37 धावांचं योगदान दिलं. दुसरीकडे शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी 30-30 धावांची खेळी केली.
मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या. सरफराज खानने शानदार फलंदाजी करताना 134 धावांची खेळी केली. याशिवाय यशस्वी जैस्वालने 78 आणि पृथ्वी शॉने 47 धावांचं योगदान दिलं. एमपीच्या वतीने गौरव यादवला चार आणि अनुभव अग्रवालला तीन यश मिळाले.
एमपीला 162 धावांची आघाडी मिळाली
374 धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा पहिला डाव 536 धावांत आटोपला. संघ: रजत पाटीदार, शुभम शर्मा आणि यश दुबे यांनी या चमकदार कामगिरीमध्ये उत्कृष्ट योगदान दिलं, ज्यांनी शतकं झळकावली. रजत पाटीदारने 122 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात 20 चौकारांचा समावेश होता. दुसरीकडं, यश दुबेने 133 आणि शुभम शर्माने 116 धावा केल्या. मुंबईकडून शम्स मुलानीने सर्वाधिक 5 बळी घेतले.
रणजी ट्रॉफीचे शेवटचे पाच विजेते:
> 2021-22 मध्य प्रदेश
> 2019-20 सौराष्ट्र
> 2018-19 विदर्भ
> 2017-18 विदर्भ
> 2016-17 गुजरात
> मुंबई 41 वेळा चॅम्पियन आहे
87 वर्षांच्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मध्य प्रदेशचा संघ फक्त दुसरा अंतिम सामना खेळत होता. त्याचवेळी 41वेळा चॅम्पियन मुंबईचा सांघिक विक्रम हा 47वा अंतिम सामना होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात मध्य प्रदेशने बंगालचा 174 धावांनी पराभव केला. दुसरीकडं पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने उत्तर प्रदेशवर विजय मिळवला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे