मध्य प्रदेश: मंदिरात हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

कटनी, ४ डिसेंबर २०२२ :मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना घडली आहे . मध्य प्रदेशातील कटनी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा मंदिरातच मृत्यू झाला आहे. मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होण्यासाठी तो खाली वाकला आणि त्याला पुन्हा उठता आले नाही. तो बराच वेळ त्याच स्थितीत बसला. लोकांनी जवळ जाऊन पाहिले तर तो मरण पावला होता. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.

संपूर्ण घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ शनिवारी समोर आला. राकेश मेहाणी (४२) असे मृताचे नाव असून, तो संत नगर येथे राहत होता. गुरुवारी सायंकाळी साई मंदिरात दर्शनासाठी गेला असता ही घटना घडली. दरम्यान, कुटुंबीयांनी राकेशचे शवविच्छेदन करून घेतले नाही. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण समजू शकले नाही. मृत्यूचे संभाव्य कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मंदिराचे पुजारी प्रदीप कुमार त्रिपाठी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राकेश मेहाणी गुरुवारी मंदिरात आले होते, ते दर गुरुवारी ते साई मंदिरात येत असत. आल्यावर त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मूर्तीची प्रदक्षिणा केली. परिक्रमेनंतर त्यांनी मस्तक टेकवले. सुमारे एक मिनिटानंतरही ते उठले नाही तेव्हा मंदिरात उपस्थित भाविकांनी ते उठत नसल्याचे सांगितले, त्यानंतर मी तेथे गेलो, पण त्याच्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती, तोंडाला पाणीही आले होते, पण ते काही उठले नाहीत. त्यानंतर इतर लोकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा