मुंबई, दि.४ जून २०२०: हिंदी चित्रपटसृष्टीसाठी २०२० हे वर्ष वाईट असल्याचे दिसत आहे. कारण एकाहून एक दिग्गज तारे निखळताना दिसत आहे. इरफान खान, ऋषि कपूर, वाजीद खान यांच्यानंतर आता प्रसिद्ध दिगदर्शक बासू चटर्जी यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते.
१० जानेवारी १९३० रोजी कोलकाता येथे बासू चटर्जी यांचा जन्म झाला. सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में यांसारखे सुंदर चित्रपट दिले.
बासूदा आपल्या चित्रपटांतून कायम मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत असत . मुंबईतील बस स्टॉपपासून चाळीपर्यंत घडणा-या गोष्टींचे चित्रण त्यांनी आपल्या चित्रपटातून केले. ‘पिया का घर’ ‘खट्टा मिठ्ठा’ असे सरस चित्रपट हि त्यांनी दिले.
पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन हि केले. हृषीकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी यांच्या त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले.
बी. आर. चोप्रा यांनी ‘छोटीसी बात’च्या वेळी बासू चटर्जींना स्वातंत्र्य दिल्याने निखळ मनोरंजन करणाऱ्या मध्यमवर्गीय चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला. राजेंद्र यादव यांच्या ‘सारा आकाश’ कादंबरीवर बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या ‘भुवनशोम’च्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.
त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीतील कसलेला दिगदर्शक गेला. अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: