मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होणार मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात

 

मुंबई दि १५ जून २०२० : महाराष्ट्रातील अर्थचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली असून १२ मोठ्या सामंजस्य करारांवर आज (सोमवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या होणार आहेत.

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई , उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांचीही उपस्थिती राहील. या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका , चीन , दक्षिण कोरिया , सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे.

जागतिक स्तरावरील नामांकित उद्योजक, प्रमुख देशांचे राजदूत व देशातील मोहिमा आणि द्विपक्षीय गुंतवणूक संस्था यांच्यासमवेत संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सत्राचे आयोजन केले आहे. थेट परदेशी गुंतवणूकीसाठी शेर्पा म्हणून प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी – डॉ. पी. अनबलगन हे देखील उपस्थित असणार आहेत.

कोरोना संसर्गाच्या विरोधात अवघे विश्व लढा देत असताना जगभरातील उद्योग व व्यापार ठप्प झाले असल्याने जगाचं अर्थचक्र या गर्तेत अडकलेलं आहे. त्याचा राज्यावर देखील विपरित परिणाम झाला असला तरी या टाळेबंदीत महाराष्ट्रात साठ हजारपेक्षा अधिक उद्योग यशस्वीरित्या पुन्हा सुरू झाले असून त्यातून जवळपास १५ लाख कामगार रुजू झालेले आहेत.

या टाळेबंदीत राज्याला परकीय गुंतवणूकीची संधी उपलब्ध झाली आहे. गुंतवणूक, निर्यात, स्पर्धा व व्ययसाय सुलभता या घटकांच्या आधारे राज्यातील उपलब्धतेमुळे दक्षिण पूर्व आशियामध्ये त्यांच्या पुरवठा साखळीत विविधता आणू पाहणाऱ्या उद्योगांनी उत्तम गुंतवणूकीचे ठिकाण म्हणून प्राधान्य दिले आहे.

या विशेष संवाद कार्यक्रमात यू एस ए, चायना, साऊथ कोरिया, सिंगापूर व भारतातील अनेक उद्योग समूह यांच्या दरम्यान मा. मुख्यमंत्री व मा. मंत्री (उद्योग) यांच्या उपस्थित व्हिडीओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होणार आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून रोजगाराचाही प्रश्न सुटणार आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री इतर देशांचे राजदूत व जागतिक उद्योग संघटनांना संबोधित करणार आहेत. या सह वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर स्वाक्षरी होणार आहे. यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुणवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल.

या करारांमुळे आपली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ची सुरुवात होईल. त्यात प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, ४०,००० एकराहून अधिक क्षेत्रफळाची लँडबँक, लवचिक भाड्याने आणि किंमतीची रचना, महापरवान्याच्या माध्यमातून ४८ तासात स्वयंचलित परवानग्या, विशेष कामगार संरक्षण मार्गदर्शन व स्थानिक कौशल्य यासाठी कामगार ब्युरो सारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा