Maha e-Seva Center Scam,Citizens Protest Over Extra Charges: महा-ई-सेवा केंद्रांवर दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्कामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा चार ते पाच पट अधिक रक्कम उकळली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून, विद्यार्थी आणि पालकांना याचा मोठा फटका बसत आहे.
शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले रहिवासी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर यांसारखे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महा-ई-सेवा केंद्र चालक निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैसे आकारून सर्रासपणे लूट करत आहेत. यामुळे गरजू विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
कुठे कराल तक्रार?
जर कोणत्याही महा-ई-सेवा केंद्र चालकाने किंवा कर्मचाऱ्याने शासकीय दाखल्यांसाठी अतिरिक्त रक्कम घेतल्यास, तुम्ही तुमच्या हद्दीतील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकता. पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “महा-ई-सेवा केंद्र चालकांनी निश्चित दरापेक्षा जास्त रक्कम घेतल्यास, पुराव्यासह तक्रार करावी. त्याची शहानिशा करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जातो आणि त्यानुसार कारवाई केली जाते.” अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज करताना स्वतःचा मोबाइल नंबर देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून अर्जाच्या कार्यवाहीची माहिती थेट त्यांना मिळू शकेल. तसेच, ‘आपले सरकार’ वेबपोर्टलवरून मिळणारी पावती जपून ठेवावी, कारण त्यावर शुल्काचा स्पष्ट उल्लेख असतो.
या लुटीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. नागरिकांनी जागरूक राहून अशा गैरव्यवहारांची त्वरित तक्रार केल्यास, यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे













































