महाड, ७ डिसेंबर २०२२ : सहा डिसेंबर हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या दिवशी या थोर महामानवास आदरांजली वाहून अभिवादन केले जाते.
ज्या महापुरुषाने समाजातील अंध:कार दूर करून सर्व स्तरातील उपेक्षित जनसमुदायास प्रकाशमय जीवन दिले त्यास कोट्यावधी जनसमुदाय या दिवशी अभिवादन करतो.
रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले एक ऐतिहासिक शहर. या शहरातील दलित मित्र खांबे गुरुजी ट्रस्ट महाडतर्फे महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘चवदार तळे’ येथील बाबासाहेबांच्या स्मारक परिसरात १ हजार ६६ मेणबत्त्या प्रज्वलित करून महामानवाला अनोखे अभिवादन करण्यात आले.
यंदाचा हा ६६ वा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मेणबत्तीच्या साह्याने ६६ अंक असलेली नेत्रदीपक ज्योतीची रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद कुमार खांबे यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य तसेच बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : दिनेश पिसाट