माढा, २६ डिसेंबर २०२०: गावपातळीवर महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ग्रामपंचायतींची माढा तालुक्यातील कोंडारभात रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्तेचे सिंहासन आपल्या ताब्यात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केल्याने माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचे धुमशान रंगत आहे. नववर्षात ग्रामपंचायतीत सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेआहे.त्यातच १४ वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या नावे येत असल्याने आता जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य यांना जेवढे महत्त्व नाही तेवढे ग्रामपंचायत सरपंचाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच कोंढारभाग हा भागायती भाग असल्याने ऊस केळी हमखास उत्पन्न देणारी पिके घेतली जातात यामुळे आर्थिक उन्नती बरोबर राजकीय उन्नती व्हावी यासाठी सगळी कडे वातावरण ढवळून निघाले आहे.
आलेगाव बुद्रुक, आलेगाव खुर्द, रूई, रांझणी-भिमानगर, गारअकोले, टाकळी टे, शेवरे,नगोर्ली, शिराळ टे, शिराळ या व ईतर अशा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा धुरळा उडाल्याने कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत, तर सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर असल्याने स्थानिक मातब्बरांचा काहीसा हिरमोड होऊन बुचकळ्यात पडले आहेत.बहुप्रतीक्षेतील निवडणूक जाहीर झाल्याने सर्व गट, तट मोर्चेबांधणीला लागले आहेत.
ग्रामीण भागात ग्रामपंचायत ताब्यात असणे, ही तालुक्यातील मोठी राजकीय प्रतिष्ठा मानली जाते. तसेच गावचे सरपंचपद हे मानाचे. अलीकडच्या काळात सर्वात जास्त निधी ग्रामपंचायतींकडेच असल्याने सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.
मात्र, यंदा सरपंचपद कोणाकडे जाणार हे निवडणुकीनंतर कळणार आहे. त्यामुळे खर्च कुणी आणि कोणासाठी करायचा हा मुद्दा उपस्थित झाला आहे.
एकीकडे खर्च कुणी करायचा हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे, गावागावात निवडणुकाच्या दरम्यान लोकशाहीच्या उत्सवाप्रमाणे जो माहोल असतो तो सध्या तरी पाहायला मिळत नाही. गावकारभार पाहणारी सुज्ञ राजकारणी मंडळी यातून आता कसे मार्ग काढतात आणि सरपंच पदी विराजमान होतात हे पाहावे लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील