या शहरात रात्र घालवली की राजकारण्यांची सत्ता जाते?

Ujjain Mahakaleshwar Temple superstition
या शहरात रात्र घालवली की राजकारण्यांची सत्ता जाते?

Ujjain Mahakaleshwar Temple superstition: मध्य प्रदेशातील एक ऐतिहासिक आणि अध्यात्मिक नगरी. इथेच वसलेलं आहे महाकाळेश्वराचं भव्य मंदिर, जे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशभरातून हजारो भक्त इथे दररोज दर्शनासाठी येतात. पण या मंदिराबाबत एक अशी अफवा किंवा श्रद्धा आहे, जी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करते कोणताही मंत्री, मुख्यमंत्री किंवा राजा उज्जैनमध्ये रात्र घालत नाही. का बरं?

भीती की भक्ती?

म्हणतात, जो कोणी सत्ता असलेला माणूस (जसं की मंत्री, मुख्यमंत्री किंवा राजा) उज्जैनमध्ये विशेषतः महाकाळ मंदिराजवळ रात्र घालवतो, त्याची सत्ता लवकरच जाते. ही समजूत इतकी पक्की आहे की अनेक राजकीय नेते स्वतः याची अंमलबजावणी करतात. ते उज्जैनमध्ये दिवसा येतात, दर्शन घेतात, पूजाअर्चा करतात… पण सूर्य मावळण्यापूर्वी निघूनही जातात.

इतिहास काय सांगतो?

इतिहासातही असे काही उदाहरणे सापडतात की काही शासकांनी उज्जैनमध्ये रात्र घालवल्यावर त्यांचे सत्तेचे दिवस कमीच राहिले. त्यामुळं हळूहळू ही बाब एक परंपरेसारखीच स्वीकारली गेली. अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीसुद्धा यावर विश्वास ठेवतात.

केवळ अंधश्रद्धा?

हे खरंच आहे का? की ही केवळ एक अंधश्रद्धा? यावर मतमतांतरे आहेत. काही लोक म्हणतात की ही एक पुरातन कथा आहे ; जेथे धर्म, सत्ता आणि भय एकत्र गुंफले गेले आहेत. तर काही जण याकडे केवळ एक मनोवैज्ञानिक प्रभाव म्हणून पाहतात. “जर एखाद्याने याचा भंग केला आणि सत्ता गेलीच तर?” या भीतीनेच बहुतेक नेते सावध राहतात.

महाकाळाचं वेगळेपण

महाकाळ म्हणजे काळाचा राजा. यमराजालाही नियंत्रित करणारा हा देव, ज्याच्या मंदिरात कालसर्प योग शांतीपासून मृत्युनिवारण पर्यंत अनेक पूजा होतात. असं मानलं जातं की, महाकाळाजवळ खोटं टिकत नाही, अहंकार चालत नाही आणि काळ लवकर उलटतो.

शेवटी काय?

उज्जैनच्या या परंपरेमागे खरी भावना भक्तीची आहे, भीतीची नाही. सत्तेवर असलेले लोकही माणूसच असतात. त्यांचं मनही कुठंतरी असुरक्षित असतं, म्हणून ते अशा श्रद्धांवर विश्वास ठेवतात. पण हे सुद्धा सत्य आहे की उज्जैन आणि महाकाळ यांचं नातं फक्त एक ज्योतिर्लिंगापुरतं नाही, तर शतकानुशतकांची श्रद्धा आणि संस्कृती यामध्ये गुंफलेलं आहे. उज्जैनमध्ये रात्र न घालवण्याची ही परंपरा कितपत खरी, कितपत मनोवैज्ञानिक, हे ठरवणं आपल्यावर आहे. पण एक मात्र नक्की! महाकाळाच्या नगरीचं आकर्षण आणि गूढ, अजूनही सगळ्यांनाच भुरळ घालतं!

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रज्ञा शिंदे