अजितदादांच्या प्रश्नावर महामेट्रोचे सीईओ हर्डिकर झाले निरुत्तर, महिलेच्या तक्रारीवरून केली विचारणा

पुणे, १२ ऑगस्ट २०२३ : आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील चांदणी चौकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पुण्यामध्ये होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोतून रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. त्यावेळी पवार यांनी प्रवाशांचीही विचारपूस केली. यावेळी दादा मेट्रो स्टेशनवर सर्वाधिक बिहारी लोक काम करताना दिसत आहेत, अशी तक्रार एका महिलेने अजित पवार यांच्याकडे केली. त्यावेळी दादांनी लगेच महामेट्रोचे सीईओ श्रावण हर्डीकर यांना खडे बोल सुनावले. मात्र, यावेळी श्रावण हर्डीकर यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आले नाही.

यावेळी अजित पवार यांनी तुम्ही आजपर्यंत मेट्रोने किती वेळा प्रवास केला. कुठे काम करता, अशी विचारपूस एका महिला प्रवाशाला केली. त्यावर ती महिला म्हणाली की, मी एका ऑफिसमध्ये काम करते. पण दादा मेट्रो स्टेशनवर सर्वाधिक बिहारी लोक काम करताना दिसत आहेत, अशी तक्रार महिलेने अजित पवार यांच्याकडे केली. हे खरे आहे का? आपण कोणताही प्रकल्प करताना स्थानिक तरुणांना संधी देतो. जर स्थानिकांना संधी दिली नाही, तर त्यांच्यामध्ये रोष पाहण्यास मिळतो, अशा शब्दात अजित पवार यांनी महामेट्रोचे सीईओ श्रावण हर्डीकर यांना सुनावले. पण त्यावर श्रावण हर्डीकर यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आले नाही.

आज शहरात पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा