महापालिकेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

पुणे, दि.२३ मे २०२०: पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा अनुभव शुक्रवारी( दि.२२) रोजी पाहायला मिळाला. एका व्यक्तीचा मृतदेह पाच तास रस्त्यावर पडून होता. रुग्णवाहिकेच्या जबाबदारी टाळण्याच्या नादात त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शी जयंत गद्रे व महेश भंडारे यांनी ” न्युज अनकट ” शी संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती दिली. याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार पेठ परिसरात साधारणतः दुपारच्या सुमारास एक ५५ ते ६० वर्षांचा वृद्ध अर्धनग्न अवस्थेत आढळला. त्याला एका व्यक्तीने बाजूला बसण्यास सांगितले मात्र, त्याने त्याचे ऐकले नाही. या रस्त्यावरून ये-जा सुरू असल्याने मी पोलिसांना फोन करून त्यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस घटनस्थळी दाखलही झाले. त्यांनी त्या व्यक्तीला खायला दिले व पाणी हि दिले. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला. मात्र रुगवाहिका जवळपास एक ते दीड तासाने घटनास्थळी दाखल झाली. त्यात आलेल्या डॉक्टरांनी त्या पेशंटची लांबूनच तपासणी केली. त्या व्यक्तीला श्वसनाचा त्रास आहे , तसेच आम्ही ज्या रुग्णवाहिकेत आलो आहोत ती कोविडची नाही, कोविडची रुग्णवाहिका पाठवतो असे सांगून ते निघून गेले.

त्यानंतर महानगरपालिकेची दुसरी रुग्णवाहिका सायंकाळी पाचच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर डॉक्टरांनी त्या पेशंटची तपासणी केली व त्यानंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर तिसरी रुग्णवाहिका दाखल झाली. त्या मृतदेहाला त्यांनी बेवारस घोषित केले. असे मृतदेह आम्ही नेत नाही, आणि एक नंबर देऊन ती रुग्णवाहिका घटना स्थळावरून निघून गेली.

या सगळ्या घटनेनंतर एक ते दीड तासाने चौथी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यातून पालिकेचे कर्मचारी उतरले. मात्र त्यांच्याकडे फक्त पीपीटी किट होते. त्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, आमच्याकडे माणसे उपलब्ध नाहीत.तुम्हीच माणसांची सोय करा. त्यानंतर पोलिसांनी सोय केली व तो मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला.

कोविड काळात प्रत्येक रुग्णासाठी वेगवेगळी रुग्णवाहिका असते असे सामान्य माणसाला काय माहीत ?, हे सांगणे प्रशासनाचे काम आहे. मात्र या घटनेत ते पाहायला मिळाले नाही. प्रत्येकाने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
या सर्व परिस्थितीतून महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

एका व्यक्तीचा मृतदेह जवळपास पाच तासांहून अधिक काळ रस्त्यावर पडून होता. तरी पालिकेकडून याची दखल घेतली गेली नाही. पोलीस यंत्रणेकडून यासाठी चांगले सहकार्य मिळाले. मात्र पालिकेच्या कारभाराबाबत मात्र प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उभे राहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा