येवल्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव

येवला, नाशिक ४ ऑगस्ट २०२३ : मागच्या हंगामामध्ये हाता तोंडाला आलेली पीके अवकाळी पावसामुळे जमीन दोस्त झाली. त्यामुळे शेतकरी चांगलाच हातबल झालेला पाहायला मिळाला. चालू हंगामात मान्सून उशिरा दाखल झाला. त्याचबरोबर राज्यात सर्व दूरपर्यंत म्हणावा असा पाऊस झालेला नाही. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. बाजारातील बोगस खते, बी बियाणे आणि औषधांमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यातच आता शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

येवला तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. कारण सोयाबीन पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा येवला तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लगावली. या पावसावर येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिक घेतले आहे.

त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आता आलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करून देखील हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. सोयाबीनवर एकरी ३० ते ३५ हजार रुपये केलेला उत्पादन खर्च वाया जातो की काय? असा मोठा प्रश्न शेतकऱ्या समोर उभा ठाकल्याने आता शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा