बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये सर्व्हर डाऊनमुळे ग्राहकांची अडचण; आर्थिक व्यवहार ठप्प!

BOM Server Down Bank of Maharashtra Server Down

BOM Server Down: बँक ऑफ महाराष्ट्रच्या निगडीसह शहरातील काही शाखांमध्ये गुरुवारी (दि. १७ जुलै) सकाळपासून सर्व्हर डाऊन झाल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महत्त्वाच्या कामासाठी बँकेत आलेल्या अनेक ग्राहकांना तासन् तास वाट पाहावी लागली, तर काहींना रिकाम्या हातानेच परतावे लागले. दुर्दैवाने, बँक बंद होईपर्यंत सर्व्हर पूर्ववत झालाच नाही, ज्यामुळे ग्राहकांचे अनेक आर्थिक व्यवहार रखडले.

सकाळपासूनच निगडीतील बँकेच्या शाखेमध्ये सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. पैसे काढणे, भरणे, धनादेश वटवणे किंवा पासबुक अपडेट करणे यासारख्या कोणत्याही सेवा ग्राहकांना मिळू शकल्या नाहीत. बँकेतील कर्मचाऱ्यांनी सर्व्हर डाऊन असल्याची माहिती दिली, परंतु तो कधी पूर्ववत होईल, याबाबत निश्चित वेळ देऊ शकले नाहीत, त्यामुळे ग्राहकांची निराशा झाली.

या समस्येमुळे दुपारच्या सत्रात बँकेत शुकशुकाट होता. नागरिक शिवम बच्छाव म्हणाले, “सर्व्हर डाऊन असल्याने खूप वेळ बँकेत थांबूनही काम झाले नाही.
आता परत उद्या यावे लागेल.” तर, अशोक दाणेकर यांनी संताप व्यक्त करत म्हटले, “मी कामातून वेळ काढून बँकेत आलो होतो, कारण मला तातडीने ऑनलाइन पेमेंट करायचे होते. सर्व्हर डाऊन असल्याने माझे काम अडले. बँकेने ग्राहकांच्या सोयीचा विचार करून अशा तांत्रिक समस्या लगेच दुरुस्त कराव्यात.”
बँक ऑफ महाराष्ट्रचे उप आंचलिक प्रबंधक रघुवंश मिश्रा यांनी मान्य केले की, “सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक कारणांमुळे काही शाखांमध्ये सेवा प्रभावित झाल्या आहेत. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

मात्र, या घटनेमुळे तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांचे कसे हाल होतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. बँकेने तातडीने ही समस्या सोडवून ग्राहकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे